Sat, Jul 04, 2020 03:49होमपेज › Satara › कराड :  मसूर ग्रामपंचायतीत सत्तांतर; उंडाळकर गटाचा धुव्वा 

कराड :  मसूर ग्रामपंचायतीत सत्तांतर; उंडाळकर गटाचा धुव्वा 

Published On: Feb 25 2019 2:57PM | Last Updated: Feb 25 2019 2:57PM
मसूर : प्रतिनिधी

कराड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मसूर ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार,  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाचा धुव्वा उडवून सत्तांतर घडवले आहे.

मसूरसह परिसर आमदार बाळासाहेब पाटील गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  आमदार बाळासाहेब पाटील यांचे समर्थक जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांना आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक तथा  जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची मदत मिळाली आहे.  या दोन्ही गटांचे जनशक्ती पॅनेल सरपंच पदासह १६ जागांवर विजयी झाले आहे. तर विरोधी  मसूर नागरिक पॅनेलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.  कराड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर समर्थक वसंतराव जगदाळे यांनी मसूर नागरिक पॅनेलचे नेतृत्व केले.

मसूरमध्ये सत्तांतर झाल्याने रखडलेली विकासकामे मार्गी लागतील अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक कामे रखडली असल्याने आता ही कामे नवीन सत्ताधारी कशा पद्धतीने करतात याकडे लोकांचे लक्ष असेल. तसेच नवीन सत्ताधाऱ्यांचा ही कामी करवून घेण्यासाठी कस लागणार आहे.