Sat, Sep 21, 2019 06:43होमपेज › Satara › विरोधी पक्षातील अनेक मित्रांनी माझ्यासाठी जीवाचे रान केले : नरेंद्र पाटील 

विरोधी पक्षातील अनेक मित्रांनी माझ्यासाठी जीवाचे रान केले : नरेंद्र पाटील 

Published On: Apr 24 2019 1:41AM | Last Updated: Apr 24 2019 1:41AM
सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात परिवर्तन हवे असल्याने वरिष्ठांचा दबाब असतानाही विरोधी पक्षातील अनेक मित्रांनी माझ्यासाठी जीवाचे रान केले आहे. अनेक बैठकांमध्ये त्यांनी आम्ही तुमचेच असल्याचे सांगितले असल्याचा दावा युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

नरेंद्र पाटील म्हणाले, विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी अनंत इंग्लिश स्कूल येथून मतदान करून सुरुवात केली आहे. तर मी त्याठिकाणी भेट देऊन समारोप केला आहे. माझी आणि राजेंची व्यक्तिशः लढाई किंवा वैर नाही. मी त्यांच्या विरोधात विकासाच्या मुद्यावर लढायला उतरलो आहे. जरी निवडणूक संपली असली तरी मी कायमस्वरूपी विकासाच्या मुद्यावर दोन हात भांडण्यासाठी मोकळा आहे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले. 

सातारकरांनी मतदानाच्या माध्यमातून खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. ज्या ठिकाणी मतदान होते त्या ठिकाणी नक्कीच परिवर्तन होते. हे परिवर्तन शंभर टक्के विकासाच्या बाजूने होईल हे मी ठामपणे सांगू शकतो. फार कमी वेळेत भाजप, शिवसेना, माथाडी आणि मित्रपक्ष मतदारापर्यंत पोहचला आहे. वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. मी काय काम भविष्यात करणार याचा आधार धरून लोकांनी विश्‍वास ठेवला आणि मतदान केले आहे. शिवसेना मित्रपक्ष आणि सिंहाचा वाटा असलेल्या भाजप माझ्यासोबत आहे. मिसळ खातानाही मी मित्राचा उल्लेख केला होता. एका मित्राने दुसर्‍या मित्राला मदत केली आहे. विरोधी पक्षातील अनेक मित्रांनी मला मदत केली आहे. त्याचे कारण त्यांना जिल्ह्यात परिवर्तन हवे आहे. जिल्हयातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. कारखाने बंद आहेत. पर्यटन स्थळावर दादागिरी नको विकास हवा आहे. ज्यांना विकास हवा आहे अशा सर्व मित्रांनी मला मदत केली असल्याचा दावा पाटील यांनी केला.

ते पुढे म्हणाले, निवडणुकीमुळे वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह मित्रांनी जीवाचे रान केले आहे. पक्षाच्या वरिष्ठांचा दबाब असतानाही परिवर्तन हवे असल्याने मदत केली आहे. किती आमदार सोबत असल्याचे विचारले असता, त्यांनी सांगितले की, याबाबत 23 मेला निकाल लागल्यावरच कळेल. कार्यकर्ते, जि.प. सदस्य, आमदार, माजी आमदार, बाहेरचे लोक माझ्या पाठीशी आहेत. नक्की कोणी मदत केली हे मतमोजणीनंतर बाहेर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.