Tue, Jun 18, 2019 10:19



होमपेज › Satara › खंडाळ्यानजीक भीषण अपघातात ४ ठार

खंडाळ्यानजीक भीषण अपघातात ४ ठार

Published On: May 19 2019 4:29PM | Last Updated: May 19 2019 4:35PM




खंडाळा : वार्ताहर

सावंतवाडीकडून बोरिवलीकडे भरधाव वेगाने निघालेली बोलेरो जीप रविवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान पारगाव खंडाळ्यानजीक महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला. सर्व ठार झालेले हे एकाच कुटुंबातील असून ते लग्न उरकून निघाले होते. 

विनायक कामत (रा. तळवडे, ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) हे मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी आपली पत्नी स्मिती कामत, मेहुणे बाळकृष्ण शंकर सामंत (वय 66, रा. दहिसर, मुंबई) व विलास सामंत (रा. पाट, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्यासमवेत मुंबईहून गावी सावंतवाडीला लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नकार्य झाल्यानंतर रविवारी पहाटे ते महिंद्रा बोलेरो जीप (एमएच 47 एबी 1784) ने बोरिवली, मुंबईकडे निघाले होते. त्यांची जीप सातारा-पुणे महामार्गावरील जुन्या खंबाटकी टोल नाक्याजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला मालट्रक (केएल 16 यू 4420) ला पाठीमागून धडकली. 

या अपघातात विनायक कामत, बाळकृष्ण सामंत, विलास सामंत हे जागीच ठार झाले. तर स्मिती कामत या गंभीर जखमी झाल्याने  त्यांच्यावर खंडाळा येथे खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. मात्र, या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चालक रवि गावकर (रा. जुहू सर्कल, मुंबई) गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान, अपघात घडताच स्थानिक हॉटेल चालक, नागरिकांनी जखमींना जीपमधून बाहेर काढून खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर पोलिसांनी ट्रकमध्ये अडकलेली जीप क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, बाळकृष्ण सामंत यांची पत्नी व दोन  मुली सुट्टी निमित्त दि. 16 रोजी  पाचगणी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. अपघातानंतर काही वेळातच ही घटना त्यांना समजली. त्या तिघीही तातडीने खंडाळा येथील मानसी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. यानंतर मयत व जखमींची ओळख पटली.