Sun, Jul 05, 2020 11:32होमपेज › Satara › लोणावळा शहरात पावसाची संततधार

लोणावळा शहरात पावसाची संततधार

Last Updated: Jun 03 2020 1:49PM

लोणावळा रस्त्यावर मोठमोठी तुटून पडलेली झाडेलोणावळा (पुणे) : पुढारी वृत्तसेवा 

'निसर्ग' या चक्रीवादळाचा फटका मुंबईसह कोकण किनारपट्टीला बसत असतानाच घाटमाथ्यावर असलेल्या लोणावळा शहराला देखील या वादळाचा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत. लोणावळा शहरात सकाळपासूनच अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे तुटून पडण्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे शहरातील काही अंतर्गत रस्ते देखील बंद झाले आहेत.

अतितीव्र चक्रीवादळामध्ये जोरदार वारे वाहण्याची आणि पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने लोणावळेकरांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण शहरात स्पीकरच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने गावातील कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी नगरपरिषद सांगतील त्या शाळेत त्वरित स्थलांतरित व्हावे, आवश्यक पिण्याच्या पाणी भरून ठेवाव्यात, सर्वांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत, इन्वर्टर चार्ज करून ठेवावेत, चक्रीवादळा दरम्यान कोणीही विनाकारण घरातून बाहेर पडू नये, नदी व धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा असल्याने तेथील लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, झाडांच्या खाली किंवा जवळ थांबू नये, कोणीही अफवांवर विश्वास ठेवून घाबरू नका, कोणाला काही मदत लागल्यास लोणावळा नगरपरिषद टोल फ्री क्रमांक १८००२३३५४६३ या नंबर वर संपर्क साधावा अशा सूचनांचा समावेश आहे. 

चक्रीवादळामुळे लोणावळा शहरात बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतच ६ ते ७ मुख्य रस्त्यावर मोठमोठी झाडे तुटून पडली आहे. नगरपरिषदेने ही तुटलेली झाडे बाजूला करण्यासाठी दोन पथक तैनात केली असून मदतकार्यासाठी ही वेगवेगळ्या १० पथके तैनात केल्या आहेत. याशिवाय शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू कार्य करणाऱ्या संस्थेचे २० सदस्यांचे पथक मदतीला पाचारण करण्यात आले आहे.