Wed, Jul 17, 2019 17:00होमपेज › Satara › कर्जबाजारीपणा, दुष्काळाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या 

कर्जबाजारीपणा, दुष्काळाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या 

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 17 2019 1:46AM
दहिवडी : प्रतिनिधी  
दहिवडी येथील डबर मळ्याजवळील कोकरे वस्ती येथील शेतकरी संपत तात्याबा कोकरे (वय 47) यांनी राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

दरम्यान, कर्जबाजारीपणा, दुष्काळ व नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे वर्षानुवर्षे दुष्काळाशी हिमतीने सामना करणार्‍या माणदेशी माणसाच्या संयमाचा बांध अखेर फुटू लागला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संपत कोकरे यांची दहिवडीत दीड एकर  शेती आहे. शेतीतून कमी उत्पन्न येत असल्याने ते इतर रोजगाराची कामे करत असत. कोकरे वस्ती येथे त्यांचे झोपडीवजा घर आहे. दुष्काळामुळे तो ही रोजगार कमी झाला. काम नाही तसेच शेतीतून दोन वर्षात कसलेही उत्पन्न आले नाही. त्यामुळे घर खर्च भागवणे कठीण झाले. त्यातच मुलीचे लग्न व मुलाचे शिक्षण असा खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला. घरची हलाखीची परिस्थिती व त्यातच दुष्काळी परिस्थिती यामध्ये ते पूर्ण पिचले गेले होते. नापिकीला वैतागलेल्या संपत यांनी टोकाचा निर्णय घेत अखेर आपली जीवनयात्रा संपवली. संपत कोकरे यांच्या आत्महत्येने दहिवडीत खळबळ उडाली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मयत संपत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे.

संयम सुटू लागला...

दुष्काळी परिस्थितीशी माणदेशी माणूस आत्तापर्यंत हिमतीने सामना करत असे. पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत चालल्याने शेतातून उत्पादन कमी झाले. त्यातच भर म्हणून शेतीमालाला भाव नाही. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा संयम सुटू लागला असून बाहेरून पाणी आल्याशिवाय त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळणार नाही.