Thu, May 23, 2019 22:20
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › बनावट नोटा; सातारच्या तरुणास अटक

बनावट नोटा; सातारच्या तरुणास अटक

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:35AMमिरज : शहर प्रतिनिधी 

येथील एका हॉटेलसमोर पाचशे रुपयांच्या सतरा व दोन हजार रुपयांच्या चार अशा एकूण 21 बनावट नोटा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी सोमवारी रात्री जप्त केल्या होत्या. या प्रकरणी गौस गब्बार मोमीन (रा. आझाद कॉलनी, भारतनगर, मिरज) याला अटक केली होती. या नोटा त्याला पुरवणार्‍या शुभम संजय खामकर (रा. नवीन एमआयडीसी, सातारा) याला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. मिरजेच्या पोलिसांनी सातार्‍यामध्ये काही ठिकाणी छापे टाकले आहेत. या बनावट नोटा प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची माहिती मिळाली.

येथील एका हॉटेलसमोरील बँकेजवळ गौस मोमीन हा सोमवारी रात्री उशिरा संशयितरीत्या फिरत होता. पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतले. त्याच्याजवळ दोन हजार रुपयांच्या चार व पाचशे रुपयांच्या सतरा नोटा सापडल्या. त्या नोटा गौस याचा मित्र शुभम खामकर याने दुसर्‍याला खपवण्यासाठी दिल्या होत्या, असे त्याचेम्हणणे आहे. त्या नोटा बनावट आहेत हे माहीत असताना देखील त्याने स्वतः जवळ बाळगल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याला आज अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी सातार्‍यातील  नोटा पुरवणार्‍या  खामकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक साता़र्‍यात ठाण मांडून होते. सातारा पोलिसांच्या मदतीने मिरज पोलिसांनी सातार्‍यामध्ये आज काही ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी खामकर  सापडला. तो सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे. मिरज पोलिस या बनावट नोटा प्रकरणी  त्याला अटक करणार आहेत.

शुभम खामकर सांगली पोलिसांच्या ताब्यात..

मिरज येथे सापडलेल्या नोटांप्रकरणी सातारा पोलिसांनी शुभम खामकर (रा.एमआयडीसी, सातारा) याला बुधवारी ताब्यात घेऊन सांगली पोलिसांकडे दिले असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिसांनी मात्र कारवाई सुरू असल्याचे सांगितले असून अन्य माहिती देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, बनावट नोटांमध्ये सातारा, सांगलीमधील युवकांचा समावेश राहिल्याने खळबळ उडाली आहेे. एमआयडीसी येथे या घटनेचे वृत्त पसरल्यानंतर दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू होती.