होमपेज › Satara › खरीप हंगामात कडधान्याच्या क्षेत्रामध्ये वाढ अपेक्षित

खरीप हंगामात कडधान्याच्या क्षेत्रामध्ये वाढ अपेक्षित

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 8:51PMकराड : अशोक मोहने 

सध्या खरीप हंगामाची लगबग सर्वत्र सुरू आहे. कराड तालुक्यात खरीप व रब्बी हंगामामध्ये जवळ जवळ 18 ते 20 प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. ऊस या प्रमुख पिकासह हळद, आले, टोमॅटो, केळी व द्राक्ष यासारखी नगदी पिके घेतली जातात. या खरीप हंगामात पूर्व व पश्‍चिम विभागात हायब्रिडचे पीक वाढेल. जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने मूग, चवळी, मटकी, उडीद यासह सोयाबीनचे पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे. 

कराड तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्र 86 हजार 240 हेक्टर इतके आहे. या खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकर्‍याने कंबर कसली आहे. खरीप हंगामासाठी लागणार्‍या बी-बियाणांचा पुरवठा सार्वजनिक क्षेत्राबरोबर खासगी क्षेत्रामधून होतो. या हंगामासाठी सहकारी व परवानाधारक विक्री केंद्रातून बी-बियाणे उपलब्ध करण्यात आले आहेत. 

यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, पुसा बासुमती 1, पुसा बासुमती 370, ज्वारीमध्ये महाबीज- 7, सीएसएच 9,  भाग्यलक्ष्मी, एमएसबी 4649, जेके 234, जेके 22, महिको 51 तर भूईमुगामध्ये जेएल 24, टीजी 26, जेएल 286, सोयाबीनमध्ये जेएस 335, केएसएल 441, टीएस 228, तुरीमध्ये आयसीपी एल 86, बीएसएसआर 736 , या शिवाय मूग, उडीद, सूर्यफुल आदी बियाणे या खरीप हंगामासाठी उपलब्ध आहेत. 

या खरीप हंगामासाठी खतेही उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये युरिया, एसएसपी, एमओपी, डीएपी या खतांचा समावेश आहे. शेतकर्‍यांनी रासायनिक खते वापरताना एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. कराड तालुक्यात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना, कृष्णा साखर कारखान्याच्या माध्यमातून व खासगी कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकर्‍यांना वाटप सुरू आहे. शेतकर्‍यांना खते, बियाणे, कीटकनाशके व बुरशीनाशके योग्य गुणवत्तेची व योग्य किमतीमध्ये उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागामार्फत गुण नियंत्रण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

कराड तालुक्यात सहकारी व खासगी परवानाधारक खते व बियाणे  दुकानदारांची संख्या साधारण 487  इतकी आहे. शेतकर्‍यांनी परवानाधारक दुकानदारांकडूनच खते बियाणे खरेदी करावेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

उत्पन्न वाढीसाठी शेतकर्‍यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी या हेतूने कृषी विभागाने 2018-2019 मध्ये खरीप व रब्बी पिकांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक विजेत्यास तालुका स्तरावर 2500, जिल्हा स्तरावर 5000 तर राज्य स्तरावर 10 हजार बक्षीस देण्यात येणार आहे.पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोखले, व कृषी अधिकारी भूपाल कांबळे यांनी खरीप हंगाम यशस्वीतेसाठी योग्य नियोजन केले असून शेतकर्‍यांसाठी खते, बी- बियाणे उपलब्ध करण्याबरोबर जि.प. कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

कृषी विभागाच्या विविध योजना..

पंचायत समिती मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतकर्‍यांना नवीन विहीर, विहीर दुरूस्ती, वीज पंप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी अनुदान देण्यात येत आहे. या शिवाय सर्व शेतकर्‍यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करताना होणारे विविध अपघात, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात यामध्ये मृत्यू ओढवलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रूपये  व अपंगत्व आलेल्या शेतकर्‍यांना एक लाख रूपयांचा लाभ देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत शेतकर्‍यांच्या शेतमालाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेत भात, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, भुईमुग, सूर्यफुल, कारळा, सोयाबीन, कापूस, तूर, कांदा, मका, ऊस या खरीप पिकांना तर रब्बी गहू, ज्वारी, सूर्यफुल, करडई, कांदा, हरभरा, उन्हाळी पिकांमध्ये भात, भूईमुग, कांदा या पिकांचा पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. राज्य शासन कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरणाच्या योजना राबविल्या जात आहेत.