Fri, Sep 20, 2019 22:17होमपेज › Satara › ‘ईएसआय’ असून अडचण नसून खोळंबा 

‘ईएसआय’ असून अडचण नसून खोळंबा 

Published On: Jun 16 2018 1:32AM | Last Updated: Jun 15 2018 10:21PMसातारा: महेंद्र खंदारे

सातारा जिल्ह्यातील विविध कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मंगळवारी जबरदस्त झटका बसला. कर्मचारी बीमा निगम (ईएसआय) योजनेमार्फत सातारा हॉस्पिटल येथे कर्मचार्‍यांना सहज उपचार घेता येत होते. मात्र, या हॉस्पिटलचे राज्य सरकारने तब्बल 2 कोटींचे बिल थकीत ठेवल्याने हॉस्पिटलचे एम.डी डॉ. सुरेश शिंदे यांनी या योजनेंतर्गत उपचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारच्या या उदासीन धोरणामुळे सर्वसामान्यांना याचा झटका बसला आहे. सरकारने योजनेला गांभीर्याने घेतले नसल्यानेच ही समस्या उद्भवली आहे. त्यामुळे आता ईएसआय ही योजना असून अडचण अन् नसून खोळंबा अशी झाली आहे. 

भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वसामान्य असणार्‍या व विविध कंपनीमध्ये तटपुंज्या पगारावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारने एक पाऊल टाकत ईएसआय ही योजना सुरू केली होती. या योजनेत संबंधित कंपनी आणि कर्मचार्‍याच्या वेतनातून कपात करून ही रक्कम सरकारी खात्यात जमा करण्यात येते. एखाद्या कर्मचार्‍याला आजारपण आल्यास याच रकमेतून त्याचा इलाज केला जातो. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍याला फारसा खर्च करावा लागत नव्हता. 

सातारा हॉस्पिटलनेही या योजनेतून रूग्णांना लाभ दिला होता. प्रत्येक लाभार्थ्यांने या ठिकाणी उपचार केल्यानंतर त्याचे बिल सरकारी दरबारी पाठवले जात होते. मात्र, गेली काही वर्षे लाभार्थी रूग्णांची बिले गेल्यानंतरही त्याचे पैसे या हॉस्पिटलला मिळाले नाही. त्याचा आकडा आता 2 कोटींवर गेला आहे. जोपर्यंत सरकार हे पैसे देत नाही आणि यापुढेही ही योजना सुरळीतपणे ठेवण्यासाठी ठोस हमी देत नाही त्याशिवाय ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. पैशासाठी वारंवार पाठपुरवा केल्यानंतरही राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही.

त्यामुळेच आज सर्वसामान्य कर्मचार्‍यांना झटका बसला आहे. या योजनेंतर्गत सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतात. परंतु, एखादा मोठा आजार झाल्यास किंवा शस्त्रक्रिया करावयाची झाल्यास खासगी हॉस्पिटललाच जावे लागते अशी परिस्थिती बर्‍याच ठिकाणी आहे. कराड वगळता जिल्ह्यात मोठे सुसज्ज अशा हॉस्पिटलची वानवा आहे. तसेच लहान लहान दवाखाने आहेत त्याठिकाणी भरमसाठ फी आकारत असल्याने हे कर्मचारी खासगी उपचार टाळतात. 

सातारा हॉस्पिटलमध्ये ईएसआय योजनेंतर्गत उपचार होत असल्याने बहुतांशी कर्मचारी याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, आता याच हॉस्पिटलने या योजनेतील रूग्णांना  घेण्यास नकार दिल्याने आता कर्मचार्‍यांनी जायचे कुठे? असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. 

सातारा शहरात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रूग्णालय व आर्यांग्ल आयुर्वेदिक हॉस्पिटल या ठिकाणीच आता ईएसआय योजनेच्या कर्मचार्‍यांना उपचार घेता येणार आहेत. सातारा सिव्हीलमध्ये असलेली गर्दी व उपचाराचा दर्जा यामुळे अगोदरच नाक मुरडतात आता तेथे जावे लागणार असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत राज्य सरकारने वरिष्ठ पातळीवर तात्काळ पावले उचलून सातारा हॉस्पिटलचे पैसे भागवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जर या हॉस्पिटलने या योजनेतील रूग्णांना पुन्हा न घेतल्यास या कर्मचार्‍यांना फार मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सरकारच्या उदासीन धोरणामुळे आता कर्मचार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.