Tue, Sep 17, 2019 04:28होमपेज › Satara › ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पाटणकर गटाला दिलासा

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे पाटणकर गटाला दिलासा

Published On: Mar 07 2018 11:28PM | Last Updated: Mar 07 2018 8:11PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ 

शेती बाजार समिती, जिल्हा बँक, पाटण नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व मध्यंतरीच्या व नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतही युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा करिश्मा आणि गनिमी कावा यशस्वी झाला. गेल्या चार वर्षांपासून विजयाचा चढता आलेख राखण्यात सत्यजितसिंहांना मिळालेले हे यश पाहता येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी ही परिवर्तनाकडे वाटचाल असल्याच्या चर्चा सध्या पाटण विधानसभा मतदारसंघात सुरू झाल्या आहेत.  

ग्रामपंचायत निवडणुकात विजयाचा आलेख कायम ठेवत दहापैकी तब्बल सात ठिकाणी आपल्या विचारांची सत्ता सत्यजितसिंह पाटणकर यांनी आणली. आ. देसाई यांच्या ताब्यातील तीन ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले.  रूवले, गावडेवाडी, कुसरूंड, चौगुलेवाडी  ( सांगवड ) , जींती, शितपवाडी, बेलवडे खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे सरपंच निवडून आणले.   सध्या तालुक्यातील आमदारकी, राज्य व केंद्र शासनात विरोधी पक्षांचे सरकार आहे.

मात्र तरीही विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानपरिषद व राज्यसभा यातून विविध विकासकामे करीत जनसंपर्क व व्यवसाय, पर्यटन, रोजगारनिर्मिती यातूनच सत्यजितसिंहांना ही कमालीची आघाडी मिळत असल्याच्या जनभावना आहेत. एकूणच आगामी विधानसभा निवडणुक त्यासाठीची  परिवर्तनाकडे वाटचाल ही सत्यजितसिंह पाटणकर, कार्यकर्ते, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसलाही ऊर्जा देणारी ठरत आहे.

2014 विधानसभा निवडणुकीत पहिल्याच वेळी आमदार पदाची निवडणूक लढवताना सत्यजितसिंह पाटणकर यांचा तब्बल अठरा हजाराहून अधिक मतांनी पराभव झाला. त्यानंतर बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निवडणूक आ. शंभुराज देसाई यांनी अपेक्षेप्रमाणे जिंकली. मात्र त्यानंतर झालेल्या आजवरच्या सर्वच निवडणुकात येथे सत्यजितसिंह पाटणकर यांनी आ. देसाई गटाला कोठेच डोके वर काढून दिले नाही.

शेती बाजार समितीत सर्वच्या सर्व जागा जिंकून आपल्याकडेच ज्यादा ग्रामपंचायतींचा आ. देसाई यांचा दावा मोडीत काढला. त्यानंतर जिल्हा बँकेत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनाही बहुमताने निवडून आणण्यासाठी विशेष प्रावीण्य दाखविले. पाटण नगरपंचायतीमध्ये सतरापैकी चौदा जागा मिळवत निर्विवाद बहुमत मिळविले. जिल्हा परिषदेत सातपैकी चार ठिकाणी अनपेक्षित मताधिक्य मिळवले. 


 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex