Sat, Jul 04, 2020 03:53होमपेज › Satara › पक्षबदलूंना थारा नाही : आ. विद्याताई चव्हाण 

पक्षबदलूंना थारा नाही : आ. विद्याताई चव्हाण 

Published On: Apr 20 2019 1:55AM | Last Updated: Apr 19 2019 9:07PM
पाटण : प्रतिनिधी 

सेनेच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारांच्या मिशा या राष्ट्रवादीने त्यांना मोठे केल्यानेच पिळदार राहिल्या आहेत. मात्र, सातत्याने पक्ष बदलणार्‍या उमेदवाराला सातार्‍याची जनता कदापिही स्वीकारणार नाही.  ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी आहे.  त्यांचेच थेट वंशज असलेल्या खा. उदयनराजे भोसले यांच्याच पाठीशी जनमत असून प्रचंड मताधिक्याने त्यांची हॅट्ट्रीक होणार असल्याचा विश्‍वास राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षा आ. सौ. विद्याताई चव्हाण यांनी व्यक्त केला. 

खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर, राष्ट्रीय सचिव सोनल वसईकर, जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, सुरेखा पाटील, पंचायत समिती सभापती सौ. उज्ज्वला जाधव, नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, डॉ. चंद्रशेखर घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

आ. विद्याताई चव्हाण पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खा. शरद पवार यांनी महिलांना आरक्षण, संरक्षण देताना त्या कर्तबगार होतील याची काळजी घेतली. म्हणुनच आपण सक्षम झालो आहोत. त्यांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला.  अच्छे दिनाची गाजरे नरेंद्र मोदी यांनी दाखवली पण पदरात काहीच पडले नाही. येथे महिला, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी यांच्यासह सर्वांचेच वाटोळे झाले. त्यामुळे या सरकारला आता धडा शिकवा, असे आवाहनही विद्याताई चव्हाण यांनी केले. 

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, मोदी सरकारने अन्याय केला त्याची व्याजासकट परतफेड करण्याची संधी या लोकसभा निवडणुकीत मिळाली आहे. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने येथे गटातटापलीकडे जावून खा. उदयनराजे भोसले यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सौ. स्नेहल जाधव, रेखाताई पाटील, संगीता पुजारी, सौ. शोभा कदम,  राजाभाऊ काळे उपस्थित होते. स्वागत सौ. शोभा कदम तर आभार प्रदर्शन स्नेहल जाधव यांनी केले. 

जनता उदयनराजेंच्याच पाठीशी : सौ. दमयंतीराजे

खा. उदयनराजे यांच्या प्रचारार्थ कराडच्या पंकज मल्टिपर्पज हॉलमध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तालुका काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका समिती यांच्यावतीने  महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. विद्याताई चव्हाण, सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे आदींची  प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. छ. सौ. दमयंतीराजे  यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी महाराजसाहेबांनी दिलेले योगदान बहुमोल असून त्यांच्या मनात सतत जिल्ह्याच्या विकासाचाच ध्यास असल्याचे  सांगितले. कोणत्याही बाबतीत विचार करताना सर्वप्रथम ते जनतेच्या सोईसुविधांनाच प्राधान्य देत असतात त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.