Tue, Sep 17, 2019 03:37होमपेज › Satara › पवारांनंतर आता मुख्यमंत्रीही दुष्काळी दौर्‍यावर 

पवारांनंतर आता मुख्यमंत्रीही दुष्काळी दौर्‍यावर 

Published On: May 14 2019 2:03AM | Last Updated: May 13 2019 10:41PM
खटाव : प्रतिनिधी 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दुष्काळी भागातील दौरे सुरु करुन मुख्यमंत्री आणि सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारीही दुष्काळी दौर्‍यावर येणार आहेत. विरोधकांच्या या हालचाली आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याच्या खेळीला काटशह देण्यासाठी मुख्यमंत्रीही दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचे समजत आहे. त्यांच्या दौर्‍याचे दोन दिवसात नियोजन करुन चार दिवसात प्रत्यक्ष पहाणी दौरा सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

खा. शरद पवार यांनी  सातारा जिल्ह्यातील  माण आणि बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा पहाणी दौरा करुन सरकारचे कान टोचणे सुरु केले आहे. मुंबईत बसून फोनवरुन आदेश देऊन, माहिती घेऊन दुष्काळ हटणार नाही तर त्यासाठी दुष्काळी भागात जाऊन शेतकर्‍यांच्या व्यथा जाणल्या पाहिजेत. चारा छावण्यांमध्ये जाऊन पशुपालकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. फळबागा वाचवण्यासाठी हालचाली केल्या पाहिजेत, अशी कामे मुंबईत बसून होत नाहीत असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. 

राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपापल्या जिल्ह्यांचे दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल 21 मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.  राज्यातील दुष्काळी परिस्थिती ध्यानात घेऊन शासनाने दुष्काळ निवारणाच्या वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री जिल्हानिहाय आढवा घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या सर्व हालचाली मुंबईत बसून सुरु आहेत. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ते जिल्हानिहाय संवाद साधून दुष्काळाचा आढावा घेत आहेत. 

विरोधकांनी आणि खास करुन शरद पवारांनी या प्रकारावरुन मुख्यमंत्र्यांना चांगलेच टार्गेट केले आहे. आता काँग्रेसचेही बडे नेते राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करुन आढावा घेणार आहेत. सर्वच विरोधक ग्राऊंडवर उतरुन दुष्काळ आणि टंचाई या प्रश्‍नांवरुन भाजप सरकारची कोंडी करणार आहेत. विरोधकांच्या हालचाली पाहूनच मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी भागातील दौर्‍याचे नियोजन करण्यात येत आहे. दोन दिवसात कागदावर या दौर्‍याचे नियोजन करण्यात येणार आहे. चार दिवसात मुख्यमंत्र्यांचा  दौरा  सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला तर शासकीय स्तरावरुन वेगवान हालचाली होऊन दुष्काळग्रस्तांना न्याय मिळेल. महत्वाचे म्हणजे सुस्त असणारी शासकीय यंत्रणा यामुळे गतीमान होणार आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची सुरूवातही माणमधून...

लोकसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत शरद पवार आणि मुख्यमंत्री तसेच भाजपाच्या सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये चांगलीच तु तु मै मै रंगली होती. आता दुष्काळावरुन राजकारण सुरु झाले आहे. पवारांनी सरकारलाच कोंडीत पकडण्याची आणि अद्दल घडवण्याची भाषा सुरु केली आहे. फडणवीस आणि पाटील यांनाही त्यांनी दुष्काळावरुन चिमटे काढले आहेत. जशी पवारांच्या दुष्काळी दौर्‍याची सुरुवात माणमधून झाली तशी मुख्यमंत्र्यांच्याही दौर्‍याची सुरुवात माणमधूनच होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार आणि मुख्यमंत्र्यांची जुगलबंदी रंगणार आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex