Sun, Apr 21, 2019 05:46होमपेज › Satara › कराड : किल्ले सदाशिवगड पाणी योजनेचे भूमिपूजन

कराड : किल्ले सदाशिवगड पाणी योजनेचे भूमिपूजन

Published On: Nov 08 2018 5:55PM | Last Updated: Nov 08 2018 6:18PMकराड : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सदाशिवगड संवर्धनासाठी लोकवर्गणीतून हाती घेण्यात आलेल्या पाणी योजनेचा भूमिपुजन समारंभ आज, गुरूवारी करवडी येथील महालिंगेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी विजयलिंग महाराज आणि विरवडे येथील आवडगिरी मठाचे मठाधिपती संपतगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे गडावरील नक्षत्र उद्यान तसेच गडावरील वृक्ष संवर्धनास चालना मिळणार आहे.

किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान तसेच गडप्रेमींनी गेल्या काही वर्षापासून शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकवर्गणीतून  सदाशिवगड संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. आजवर लोकवर्गणीतून गडावर लाखो रुपयांचे कामे करण्यात आली आहेत.  गडावर सुमारे पाच हजार झाडांची लागवड करण्यात आली असून या झाडांना उन्हाळ्यात पाणी कमी पडते.  त्यामुळे सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान गेल्या काही दिवसांपासून बाबरमाची येथील जयवंत मुळीक या शेतकऱ्याच्या विहिरीतून सदाशिवगडावर पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याचा  संकल्प जाहीर केला होता. त्यानंतर गडप्रेमींसह  विविध क्षेत्रातील लोकांनी सढळ हाताने सुमारे तीन लाख रुपयांची मदत जमा केली. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सदाशिवगड परिसरातील नागरिक, गडप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या महत्वकांक्षी योजनेसाठी सुमारे सतरा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून समाजातील दानशूर व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सदाशिवगड संवर्धनाला हातभार  लागणाऱ्या या योजनेला मदत करावी, असे आवाहन सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.