Fri, Sep 20, 2019 22:14होमपेज › Satara › माढा व सातार्‍यात भाजपचाच खासदार : सुभाष देशमुख

माढा व सातार्‍यात भाजपचाच खासदार : सुभाष देशमुख

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 09 2019 12:17AM
लोणंद : प्रतिनिधी

सातारा व माढा मतदार संघात भाजपचाच झेंडा फडकणार असून पश्‍चिम महाराष्ट्रातूनही पक्षाच्या  जास्तीत जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. इनकमिंगला संधी दिल्याने कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला नाही, असा विश्‍वास सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी व्यक्‍त केला.

लोणंद येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ना. देशमुख म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह हा विजयी ठरणारा आहे. भीतीदायक वातावरण नाहीसे झाले आहे. वाईत विधानसभेत क्रांती घडून सर्वाधिक मताधिक्य मिळणार आहे. राष्ट्रवादीने विजयाचा दावा केला असला तरी 23 मे रोजी याचे उत्तर मिळेल.  माढयातील उमेदवारी इनकमिंगला देताना भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय झाला का?  असा प्रश्‍न ना. देेशमुख यांना विचारल्यावर ते म्हणाले, भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु, भाजपकडे उमेदवार नाही असे नाही. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे असल्याने जो येणार त्याला घेऊ असे धोरण केले आहे.

ना. देशमुख म्हणाले, लोकसभेला उमेदवार कुठला आहे याला महत्व नाही. संपूर्ण देशातील उमेदवार चालतो. आमचा तर मतदार संघातील आहे. त्याचा काही परिणाम होणार नसून सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातून मताधिक्य मिळेल.

माढ्यातून  शरद पवारांनी माघार घेतल्याने तुमचे खासदारकीचे स्वप्न अपुरे राहिले का? या प्रश्‍नावर ना. देशमुख म्हणाले, पवारसाहेबांनी माघार घेतली ते बरं झालं. त्यामुळे लोकसभा लढवण्याचे थांबलो. भाजपने मला भरपूर संधी दिली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी विजय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

यावेळी प्रदिप माने, अनुप सूर्यवंशी, अंकुश पवार, अनिल कुदळे, अविनाश नलावडे, शंभूराज भोसले, राहुल हाडके, निखिल झगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.