Wed, Feb 26, 2020 18:50होमपेज › Satara › आकलेत मुलीकडून बापाचा खून

आकलेत मुलीकडून बापाचा खून

Last Updated: Jan 24 2020 2:21AM
कण्हेर : पुढारी वृत्तसेवा

आकले (ता. सातारा) येथे अल्पवयीन मुलीने पित्याचा गळा आवळून खून केला. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून प्रियकराच्या मदतीने तिने हे कृत्य केले.  दोघेही संशयित अल्पवयीन असून, जन्मदात्या बापाचाच खून केल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे.  तालुका पोलिसांनी 3 तासांतच घटनेचा छडा लावून प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले. 

मृत पिता मोलमजुरी करून कुटुंबाचे पालन पोषण करत होता. त्यांची पत्नी गेल्या पंधरा वर्षांपासून बेपत्ता असून मुली व मुलासमवेत ते राहत होते. मुलगा दोन दिवसांपूर्वीच कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेला आहे. बुधवारी मध्यरात्री तेे घरी आले. त्यानंतर झोपी गेले होते. पहाटेच्या सुमारास खुनाचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लगेच कसून तपासाला सुरुवात झाली व अवघ्या तीन तासांतच या खुनाचा उलगडा झाला. अल्पवयीन मुलीनेच हे क्रूर कृत्य केल्याचे समोर आले.

या मुलीचे वस्तीतीलच एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे हा मुलगा वारंवार घरी येत होता. ही बाब मुलीच्या पित्याला  खटकत होती. त्यातूनच मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने बुधवारी मध्यरात्रीनंतर गळा आवळून पित्याचा खून केला. रात्री 2 च्या सुमारास मुलीने स्वतःच्या काकांना वडील झोपेतून उठत नसल्याची खबर दिली.  नातेवाईकांना घटना शंकास्पद वाटल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. या घटनेबाबत मृत व्यक्‍तीच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या घटनेचा पर्दाफाश केला. 

खुनाचा प्रकार पूर्वनियोजित

खुनाच्या प्रकारानंतर सकाळी 8 च्या सुमारास सातारा तालुका पोलिस व श्‍वानपथक घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख व पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी कसून तपास करून तीन तासांत छडा लावला. संशयितांनी नियोजनबद्धरित्या खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले. पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित पाटील व सहाय्यक फौजदार दत्तात्रय कोळी अधिक तपास करीत आहेत.