होमपेज › Satara › ‘रोहयो’चा बट्ट्याबोळ

‘रोहयो’चा बट्ट्याबोळ

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 17 2019 1:46AM
सातारा : प्रवीण शिंगटे

दुष्काळाच्या हाहाकाराने जनता त्रासली असून माण-खटाव, कोरेगाव उत्तर, फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे अर्थकारण कोलमडून पडले असतानाच आता दुष्काळी पट्ट्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. अत्यल्प मोबदल्यामुळे मजुरांनी पाठ फिरवली असून जलसंधारणासह विविध कामे मंदावली आहेत. त्यामुळे कष्टकर्‍यांना दुष्काळात तेरावा महिना अनुभवावा लागत आहे. 

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस दुुष्काळाची दाहकता वाढत चालली असून पाणी व चाराटंचाईचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने दुष्काळात ग्रामीण भागातील नगारिकांना यापूर्वी चांगलाच मदतीचा हात दिला होता. मात्र, आता या योजनेच्या कामांचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र दुष्काळी भागात पाहायला मिळत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम केल्यास पगाराचा मोबदला जास्त मिळत असून शेतात शेतमजुरी केल्यास त्याचा मोबदलाही समाधानकारक असतो. शेतकर्‍यांकडून पैसेही वेळेत मिळतात. एवढेच काय, सेंट्रिंगच्या कामाचाही मोबदला प्रतिदिनी 500 रुपयांच्यावर मिळतो. मात्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कितीही तास काम केले तरी मोबदला फक्‍त 206 रुपये मिळत आहे. तो हातात मिळण्यासही 15 दिवसांहून अधिक कालावधी लागत असल्याने माण-खटावमधील मजुरांनी या योजनेच्या कामांकडे पाठ फिरवली आहे. अनेक मजुरांनी स्थलांतर केले असून ते रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. एकीकडे पाण्यासाठी भटकंती तर दुसरीकडे  रोजगारासाठीही दाहिदिशा भटकंती करण्याची वेळ दुष्काळी पट्ट्यातील मजुरांवर आली आहे. परिणामी येथील अर्थकारण पुरते कोलमडून पडले आहे. जगायचे कसे? असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. 
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील 11 तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या 507 कामांवर 18 हजार 455 मजूर काम करत आहेत. जिल्ह्याची  लोकसंख्या विचारात घेता ही रोजगार संख्या नाममात्र असल्याचे स्पष्ट होत आहे. मजुरी दर कमी, उष्मा जास्त यामुळे मजुरांनी या कामाकडे पाठ फिरवल्याचे  वास्तव आहे.
गेल्या 3 ते 4 वर्षांपासून जिल्ह्यातील पावसाचे गणित कोलमडले. त्यामुळे भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतात पेरणीच झाली नसल्याने दुष्काळी भागात बहुतांश शेतकर्‍यांच्या हातात उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे इथला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्याने पाणी टंचाईसह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 
रोहयो अंतर्गत केल्या जाणार्‍या विंधन बिहीर, वृक्ष लागवड, जनावरांचा गोठा, रस्ते, फळबाग लागवड, विहीर पुनर्भरण, शेततळी, नाला बंडिंग, माती सिमेंट नालाबांध, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळखत निर्मिती, गाळ काढणे, नाफेड खतनिर्मिती कंपार्टमेंट बंडिंग, अशा विविध कामांचा वेग मजूर नसल्याने मंदावला आहे. 
सध्य स्थितीत माण तालुक्यात 38 कामावर 1 हजार 584 मजूर, खटाव तालुक्यात 49 कामावर 3 हजार 906, कोरेगाव तालुक्यात 34 कामावर 1 हजार 824,  फलटण तालुक्यात 67 कामावर 1 हजार 502, जावली तालुक्यात एका कामावर 30 मजूर काम करत आहेत. कराड तालुक्यात 142 कामावर 2 हजार 720,  खंडाळा  तालुक्यात 37 कामावर 1 हजार 326, महाबळेश्‍वर तालुक्यात 8 कामावर 1 हजार 242,  पाटण तालुक्यात 70  कामावर 2 हजार 606, सातारा  तालुक्यात 23 कामावर 990, वाई तालुक्यात 38 कामावर 725 असे एकूण 507 कामांवर 18 हजार 455 मजूर काम करताना दिसत आहेत. असे असले तरी ही संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसत आहे. मजूर कामाकडे फिरकत नसल्याने या कामांची स्थिती बिकट झाल्याचे चित्र दुष्काळी भागात दिसत आहे. त्यामुळे कष्टकर्‍यांच्या घरातील रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.  काही नागरिकांनी शहराचा रस्ता धरला आहे.

कामाच्या तुलनेत मजुरी कमीच...

दुष्काळी परिस्थितीचा  सामना करणार्‍या ग्रामीण भागातील रविहवाशांना रोजीरोटीसाठी रोजगार हमी योजनेतील कामांचा आधार मिळत असतो. यंदा मात्र हा आधारही नाहीसा झाला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाख 3 हजार 741 एवढी आहे. ही लोकसंख्या  विचारात घेता मजुरांची संख्या 5 टक्केही नाही. मजुरीचा दर कमी असल्याचा व मोबदला वेळेत मिळत नसल्याने हा फटका बसल्याचे सांगण्यात येते. तसेच एखाद्या मजुराने दिवसभरात जास्त काम केले तरी त्याला पाहिजे तशी मजुरी मिळत नसल्यामुळे या योजनेकडे मजुरांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.