Tue, Jul 14, 2020 06:42होमपेज › Sangli › ट्रॅव्हल्सच्या धडकेत बेणापूरचा तरुण ठार

ट्रॅव्हल्सच्या धडकेत बेणापूरचा तरुण ठार

Published On: Dec 04 2018 1:32AM | Last Updated: Dec 03 2018 11:47PMविटा  : वार्ताहर 

भरधाव वेगाने विट्याहून भिवघाटाकडे निघालेल्या खासगी (ट्रॅव्हल्स) बसने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ तात्यासाहेब शिंदे (वय 21, रा. बेणापूर) असे त्याचे नाव आहे. हा अपघात सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुलतानगादे (ता.खानापूर) येथे झाला.

विटा पोलिस ठाण्यात अनिल सिदप्पा केंपवाडे याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आटपाडी येथून ती बस ताब्यात घेतली असून, चालक फरार झाला आहे.  पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः बेणापूर येथील अनिल केंपवाडे आणि सोमनाथ शिंदे हे सैन्य भरतीचा सराव करीत होते. ते विटा येथील एका अ‍ॅकॅडमीत प्रशिक्षण घेतात.  दि. 6 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे सैन्य भरती असल्याने ते दोघे गेल्या काही दिवसांपासून बेणापूर ते भिवघाट असा धावण्याचा सराव करीत होते. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे धावण्याचा सराव करीत सुलतानगादे येथे पोहोचले. पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या बसने सोमनाथ याला जोराची धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावरून बाजूला फेकला गेला. त्याच्या डोक्याला जोराचा मार लागला होता. त्याला  भिवघाट येथील 
खासगी दवाखान्यात नेले; परंतु  डॉक्टरांनी सोमनाथचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

अपघातानंतर बसचालक  भरधाव वेगाने भिवघाटकडे गेल्याचे अनिलने ग्रामस्थांना सांगितले.  त्यांनी भिवघाट येथील काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले .त्यावेळी ती गाडी आटपाडीकडे गेल्याचे  दिसले. त्यानुसार आटपाडी येथून ती बस पोलिसांनी ताब्यात घेतली. सोमनाथ याच्या पश्‍चात आई,वडील,भाऊ,दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विटा पोलिसांत अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.