Sat, Jul 11, 2020 13:19होमपेज › Sangli › नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

Published On: Apr 29 2019 9:06PM | Last Updated: Apr 29 2019 9:06PM
जत: शहर प्रतिनिधी

जत येथील यल्लामा मंदिरासमोरील विहिरीत चार महिन्यापूर्वी एका महिलेने आपल्या तीन चिमुकल्यासह उडी घेऊन आत्महत्या केली होती. जत शहरातील आत्महत्या केल्याची ही घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी एका विवाहित महिलेने घरगुती वादातून याच विहिरीत उडी घेतली. मात्र, येथे असणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. 

पण या घटनेने जत नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारवर  पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्या घटनेनंतर पालिकेच्या विरोधी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत नगर पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही यापूर्वीच विहिरीला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी केलेली आहे. ही भिंत व संरक्षक जाळे बसवण्याची मागणी केली होती. ही जाळी बसवली असती तर हा अनर्थ कधीच ठळला असता असे भाजप नगरसेवकांचे म्हणणे आहे.

घटनास्थळावरून अधिक माहिती अशी : जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागपालिकेच्या यल्लामा मंदिर परिसरात संस्थानकालीन मोठी विहीर आहे. दुष्काळामुळे या विहिरीत सध्या पाणी नाही. यात बिरनाळ तलावातील पाणी फिल्टर करून शुद्ध करून टाकले जाते व तिथून जत शहराच्या  निम्म्या भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. ही विहिर नैराश्यग्रस्त आत्महत्याग्रस्तांना जणू खुणावत आहे. तरी काही चार महिन्यांपूर्वी येथे एका विवाहित महिलेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. परंतु या घटनेनंतर पालिकेने येथे तातडीने फिर जाळे बसण्याचा निर्णय घेतला होता. परंतू त्याची कारवाई अद्याप झालेली नाही. 

दरम्यानच्या काळात सोमवारी सकाळी या विहिरीत जत येथील वसाहतीतील विवाहित महिलेचे घरात भांडण झाले होते. या भांडणाचा राग धरून या महिलेने पळत येऊन आपला जीव देण्यासाठी यल्लामा विहिरीत उडी घेतली होती. सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विहिरीत उडी घेताना काही  नागरिकांनी पाहिले व तातडीने विहिरीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी पाच फूट खोल पाणी होते परंतू वर येण्यासाठी पायऱ्या नाहीत. संबंधित महिला विहिरीत पडल्यानंतर तिला विहिरीत दगडाचा दणका बसला. पोहता येत असल्याने ती जखमी अवस्थेत विहिरीतील पाइपला धरून बसली होती. रागाच्या भरात केलेले कृत्य तिच्या लक्षात आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती आरडाओरड करू लागली. यावेळी ही घटना पाहणार्‍या काही तरुण कार्यकर्त्यांनी तातडीने तिला बाहेर काढले. ही बातमी पालिका प्रशासनाला समजताच नगर पालिकाने महिलेला वाचण्यास पुढाकार घेतला. यावेळी पालिकेचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलेच्या हाताला व शरीराला इजा झाल्याने तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.  

भाजपची पत्रकार बैठक 
या घटनेनंतर पालिकेतील विरोधी भाजप नगरसेवकांनी पत्रकार बैठक घेतली. सोमवारी जत दौऱ्यावर असणारे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली. या पत्रकार बैठकीस विरोधी पक्षनेते विजय ताड, अॅड. प्रभाकर जाधव, नगरसेवक  उमेश सावंत, संतोष मोठे, प्रमोद हिरवे, राजू यादव, जत भाजपा शहराध्यक्ष अण्णा भिसे, सद्दाम आतार, अजित कुमार पाटील आदी उपस्थित होते.