Sat, Sep 21, 2019 05:52होमपेज › Sangli › मॉर्निग वॉक करताना तब्बल अडीच लाख मिळाले आणि....

मॉर्निग वॉक करताना तब्बल अडीच लाख मिळाले आणि....

Published On: May 19 2019 4:16PM | Last Updated: May 19 2019 4:16PM
इस्लामपूर : मारुती पाटील

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या विठ्ठलवाडी (कामेरी,ता.वाळवा) येथील विलास बारपटे यांना पाणंद रस्त्यात विखरून पडलेले दोन लाख पन्नास हजार रुपयांची रक्‍कम सापडली. ते पैसे कोणाचे आहेत याचा शोध घेतला असता, ती रक्‍कम विहीर खोदकाम करणाऱ्या मजुराची असल्‍याचे समजले. यामुळे बारपाटे यांनी ते सर्व पैसे त्या खुदाई मजुरास परत केले. या घटनेने सामान्य माणसात माणूसकी आजही जिवंत आहे याचे दर्शन घडले.

याविषयी अधिक माहिती अशी की, विलास बारपटे हे विठ्ठलवाडी,ता.वाळवा येथील एक सामाण्य गृहस्थ आहेत. दररोज सकाळी ६ वाजता फिरायला जाणे हा त्यांचा दिनक्रम. आजही ते नेहमी प्रमाणे चालायला गेले. चालत असताना मध्येच त्‍यांना पाणंद रस्त्यावर नोटांचे बंडल पडलेले दिसले. विलास बारपटेंनी ते नोटांचे बंडल गोळा करुन लुंगीत घेतले व घराकडे आले. 

येताना वाटेत भेटणारा प्रत्‍येकजन त्‍यांना लुंगीत काय आहे म्हणून विचारत होता, तर विलास बारपटे त्यांना आंबे आहेत म्हणून सांगत होते. त्यांनी ही सर्व हकीकत आई-वडील,बायको व दोन मुलींना सांगून त्यांच्या पुढ्यात त्या अडीच लाख रुपयांच्या नोटा टाकल्या. सर्वाना आश्चर्य वाटले  पण आनंद  झाला नाही, कारण पैसे दुसर्‍याचे होते, श्रमाचे नव्हते. सर्व बारपटे कुटुंबाने ठरविले की या पैशाच्या मालकाचा शोध घेऊन त्याला पैसे परत करायचे. 

आणि मग सुरू झाला पैशाच्या मालकाचा शोध. त्याच रस्त्यावर अंगावर पातळाची लक्तरं झालेली एक म्हातारी बाई ये जा करत होती. तिच्या तोंडून " पाचशेचं बंडल "हे शब्द विलासने ऐकले नि तो थांबला. ती म्हातारी त्याच पैशाच्या शोधात फिरत होती. विलासने त्या म्हातारीला घेतले व त्यांच्या खोपटावर गेले. म्हातारी पैसे मिळणार होते तरी रडत होती.

बाळू गोपी चव्हाण या मजुराने  पेठ गावातील जोतिराम बापू पाटील या शेतकर्‍याची विहीर खोदण्याचे काम घेतले होते. त्या कामाचे पाच लाख रुपये बाळू चव्हाणाला त्या दिवशी जोतीराम पाटीलने दिले. ते पैसे घेऊन बाळू चव्हाण खोपटावर आला. जेवणाच्या पिशवीत पैसे ठेवले व तो झोपला. रात्री एक भटके कुत्रे खोपटात शिरले. त्याला त्या पिशवीमध्ये एखाद्‍या खाद्‍यपदार्थाचा वास आला. खायला मिळेल म्हणून कुत्र्याने पिशवी लांबवली. त्याने लांब येवून पिशवी फाडली. पण कुत्र्याला त्या पिशवीत भाकरीचा एकही तुकडा मिळाला नाही. मिळाले ते पैशाची बंडले. जी त्याची भूक भागवत नव्हते.

कुत्रे गेले नी हे विलास बारपटे तेथे आले. त्यांनी त्या पैशावर मन दाखविले नाही. विहीर मालक जोती पाटील  व प्रा.अनिल पाटील यांच्या हस्ते,वडील भीमराव बारपटे,आई,सौ.हेमा  बारपटे , इंजिनियर  पण बेरोजगार मुली नेहा व योगीता यांच्या उपस्थितीत ते सापडलेले अडीच लाखाचे धन त्या कष्टकर्‍यांना परत केले. या घटनेमुळे माणसातील  माणूसकी आजही जिवंत असल्याचे पहायला मिळाले. त्‍यांच्या या कार्याचे पंचक्रोशीत कौतूक होत आहेत.