होमपेज › Sangli › ट्रक चोरी : चौघांना अटक, जयसिंगपूरच्या तिघांचा समावेश

ट्रक चोरी : चौघांना अटक, जयसिंगपूरच्या तिघांचा समावेश

Published On: Jul 07 2018 12:35PM | Last Updated: Jul 07 2018 12:36PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील संजयनगर येथून दहा चाकी ट्रकची चोरी करणार्‍या चौघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीतील एका एजंटासह जयसिंगपूरमधील तीन युवकांचा समावेश आहे. 

प्रणेश राजू भोसले (वय १९, रा. विभूते शाळेजवळ, जयसिंगपूर), निलेश साहेबराव साळुंखे (वय १९, रा. पवार मळा, चिपरी), अनिकेत अशोक भोसले (वय १९, रा. गल्ली नं. १८, जयसिंगपूर), सचिन लक्ष्मण गवळी (वय २६, रा. नांदणी, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिकत अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. 
पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना संशयितांनी संजयनगर येथील एका डेअरीसमोरून चोरलेला ट्रक अंकली (ता. चिकोडी) येथे विक्री केल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली होती. नांदणीतील एजंट सचिन गवळीच्या मध्यस्थीतून चोरीच्या ट्रकची विक्री केल्याचीही माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. 

यातील चारही संशयितांना शुक्रवारी रात्री सापळा रचून जयसिंगपूर, नांदणी येथे ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी संजयनगर येथून ट्रक चोरून अंकलीत त्याची विक्री केल्याची कबुली दिली आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिस निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, अमित परीट, शशिकांत जाधव, सुधीर गोरे, संदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.