Sun, Jul 05, 2020 13:43होमपेज › Sangli › कुंडलवाडी, कामत, आष्टा येथील तीनजण पॉझिटिव्ह

कुंडलवाडी, कामत, आष्टा येथील तीनजण पॉझिटिव्ह

Last Updated: May 25 2020 9:41PM

file photoसांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सोमवारी तिघांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये आष्टा, कामत आणि कुंडलवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे. अतिदक्षता विभागातील चार रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. बलवडी येथील रुग्ण कोरोनामुक्‍त झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. शनिवारी सहाजण पॉझिटिव्ह होते. रविवारी चार जणांना कोरोनाची बाधा झाली. आज  तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

त्यात वाळवा तालुक्यातील आष्टा येथील झोळंबी वसाहतीतील दि. 23 रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या 25 वर्षीय पत्नीलाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील रुग्णाच्या 57 वर्षीय वडिलांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्‍ती संस्था क्‍वारंटाईन होती.  

आटपाडी तालुक्यातील खरसुंडीजवळील कामत येथे मुंबईतून आलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या वृद्धाला दि. 23 रोजी संस्था क्‍वारंटाईन केले होते. 

चौघांची प्रकृती चिंताजनक

गेल्या दोन-तीन दिवसांत कोरोना झालेल्या रुग्णांवर मिरजेच्या कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यापैकी  कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील 48 वर्षीय पुरुष, शिराळा तालुक्यातील मोहोरे येथील 50 वर्षीय पुरुष, शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील 56 वर्षीय पुरुष व धारावी ते मालगाव या बसने आलेल्या 75 वर्षांच्या महिलेची तब्बेत गंभीर आहे. 

बलवडीतील रुग्ण कोरोनामुक्‍त 

दि. 19 मे रोजी मुंबईतून आलेल्या 87 वर्षीय महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज कोरोनामुक्‍त झालेल्यांमध्ये खानापूर तालुक्यातील बलवडी येथील 55 वर्षांचा पुरुष आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत उपचार सुरू असलेले 36 रुग्ण आहेत. आजअखेर 47 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.  जिल्ह्यात आजपर्यंत 85 रुग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत.