Fri, Jul 10, 2020 19:02होमपेज › Sangli › वसगडेत सहा दुकाने फोडली

वसगडेत सहा दुकाने फोडली

Published On: Jun 22 2019 1:05AM | Last Updated: Jun 22 2019 12:06AM
भिलवडी : प्रतिनिधी

पलूस तालुक्यातील वसगडे येथे अज्ञात चोरट्यांनी सहा दुकाने फोडली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. वसगडे बसस्थानक परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

महालक्ष्मी बेकरी, हॉटेल तोहिद, गंगा मेडिकल, अमोल व शहानवाज सह अन्य दोन पानदुकाने चोरट्यांनी फोडली. अर्थात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. गंगा मेडीकलमध्ये चार हजार व अन्य ठिकाणांतून बावीसशे रुपये  घेऊन चोरांनी पोबारा केला. 

वसगडेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागाव व पाचवा मैल (ता. तासगाव) या ठिकाणीही दुकाने फोडण्यात आली. परंतु   किती ऐवज लंपास झाला त्याची माहिती मिळू शकली नाही. एकाच रात्रीत तीन गावांत चोरांनी हात साफ केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल हारुगडे यांनी सांगितले, की या चोर्‍यांचा तपास  सुरू आहे. पोलिसांनी  सर्व घटनास्थळी भेट दिली आहे. उपलब्ध सीसीटीव्ही  फुटेज वरुन चोरांचा शोध सुरू आहे.

बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार

सुरक्षिततेच्या दृष्टीने वसगडे बसस्थानक परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत न बोललेच बरे असे वसगडेचे सरपंच श्रेणिक पाटील म्हणाले.