Sat, Dec 14, 2019 11:01



होमपेज › Sangli › कामटेसह संशयितांवर दहा आरोप प्रस्तावित

कामटेसह संशयितांवर दहा आरोप प्रस्तावित

Published On: Oct 17 2018 1:38AM | Last Updated: Oct 16 2018 11:09PM



सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी न्यायालयात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहा संशयित आणि कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे यांच्याविरोधात एकूण दहा आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दि. 11 सप्टेंबरनंतर  सोमवारी सुनावणी झाली. यावेळी  कामटे, अनिल लाड, अरुण टोणे, नसिरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्यावर एकूण दहा आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये कामटेच्या मामेसासर्‍यावरही आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत. 

पहिला  आरोप : कामटेसह सर्व पोलिस, झाकीर पट्टेवाले,  बाळासाहेब कांबळे या सर्वांनी अनिकेतच्या खुनाचा कट केला. त्यानुसार  अनिकेत आणि अमोल भंडारेला अटक केली. अनिकेतकडून अन्य गुन्हे जबरदस्तीने कबूल करून घेण्यासाठी मारहाण करून खून केला. या गुन्ह्यात शिक्षा होणार असल्याचे माहीत असूनही कट रचून खोटी माहिती दिली तसेच संगनमत केले. 

दुसरा आरोप : कामटेसह सर्व पोलिस आणि पट्टेवाले यांनी खून केला. त्यासाठी संगनमत केले. 

तिसरा आरोप : कामटे, सर्व पोलिस, पट्टेवाले व  कांबळे यांनी कटानुसार दि. 7 नोव्हेंबर रोजी आंबोलीतील महादेवगड येथे अनिकेतचा मृतदेह जाळला. त्यानंतर या गुन्ह्यात शिक्षा होणार याची त्यांना कल्पना होती. तरीही त्यांनी पुरावा नष्ट केला.तसेच हे कृत्य संगनमताने केले.

चौथा आरोप : कामटेसह संशयितांनी रचलेल्या कटानुसार  कोथळेकडून अन्य गुन्हे कबुलीसाठी त्याला मारहाण करून गंभीर दुखापती केल्या. यामध्येही सर्वच संशयितांनी संगनमत केले होते.
पाचवा आरोप  : कामटेसह त्याच्या साथीदारांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना देणे भाग होते. मात्र त्यांनी ती माहिती लपवली. यातही सर्वांनीच संगनमत केले.
सहावा आरोप : कामटेसह सर्व संशयितांनी कटानुसार अनिकेत कोथळेचा खून केला होता. तरीही तो पळून गेला अशी खोटी माहिती दिली. त्यातही सर्वांचे संगनमत होते. 
सातवा आरोपः अनिकेतचा मित्र अमोल भंडारे या गुन्ह्यात साक्षीदार आहे. त्यालाही बेदम मारहाण करून दुखापती केल्या. 
आठवा आरोप : कामटेसह सर्व संशयितांनी संगनमताने, हेतुपुरस्सर अनिकेतचा शारिरिक छळ केला. त्याचा अपमान केला. तसेच शांतता बिघडवली. 
नववा आरोप : मुख्य साक्षीदार अमोल भंडारे याला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केली. 
दहावा आरोप :  कामटे, हवालदार अनिल लाड, अरूण टोणे यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर हा मुख्य पुरावा असताना तो नष्ट केला. तिघांनीही संगनमताने हे कृत्य केल्याचेही म्हटले आहे. 

सरकारी पक्षातर्फे कामटेसह सर्वच संशयितांविरोधात दहा आरोप न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यावर आता पुढील महिन्यात सुनावणी होणार असल्याचेही अ‍ॅड. निकम यांनी सांगितले. सीआयडीचे उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी अ‍ॅड. निकम यांना या कामात मदत केली.