Tue, Jul 14, 2020 04:40होमपेज › Sangli › उमेदवारीसाठी इस्लामपुरात विरोधकांत संघर्ष

उमेदवारीसाठी इस्लामपुरात विरोधकांत संघर्ष

Published On: Jun 26 2019 1:40AM | Last Updated: Jun 25 2019 11:35PM
इस्लामपूर : अशोक शिंदे

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी संपर्काच्या माध्यमातून मतदारसंघात चांगलेच रान उठविले आहे.  विरोधी भाजप-शिवसेना-काँगे्रस-महाडिक गट-रयत क्रांती-नायकवडी गट यांच्या  ‘विकास आघाडी’चा उमेदवार कोण याबाबत कमालीची चुरस अन् अंतर्गत संघर्ष सुरू  आहे. जयंत पाटील यांनी सन 1990 पासून सलग 6 निवडणुका सरासरी 50 हजारांच्या मताधिक्क्याने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या विरोधात सातत्याने काँगे्रस, भाजप, शिवसेना, रयत क्रांती यांच्यासह प्रामुख्याने नानासाहेब महाडिक गट आक्रमक राहिला आहे. 

इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा पाडाव करण्यासाठी  विरोधकांबरोबरच महाडिक गट सक्रिय होता.  विरोधकांच्या ‘विकास आघाडी’मध्ये हुतात्मा उद्योग समुहातून युवा नेते गौरव नायकवडी सहभागी आहेत. ‘सर्वोदय’मुळे आष्टा पूर्वभागात माजी आमदार संभाजी पवार गटाची तसेच भाजप नेते वैभव शिंदे यांची साथ आणि ताकद आता विरोधकांना मिळणार आहे. 

 कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  संपर्क वाढविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितल्यास  रिंगणात उतरू असे त्यांनी आधीच सांगितले आहे. त्यांचे व काँगे्रस तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे ‘सूत’ कृष्णाकाठी जुळले आहे. सत्तेच्या बळावर यावेळी  विरोधी गट  राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक झाला तर आश्चर्य वाटायला नको. मात्र या सार्‍यात  विरोधकांचा उमेदवार कोण, हा प्रश्‍न तूर्त तरी अनुत्तरित  आहे. इतकेच काय पण विरोधकांतील एकाला उमेदवारी दिली तर दुसरे  इच्छुक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किंवा पडद्याआडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतात, असा  इतिहास आहे. 

ना. खोत व  नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील मतभेदाची दरी  सातत्याने वाढते आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष पाटील व म्हाडाचे उपाध्यक्ष विक्रम पाटील यांच्यात पालिका सभांत सातत्याने खडाजंगी सुरू आहे. या मतदारसंघात  इच्छुक असल्याचे पंचायत समितीमधील गटनेते राहुल महाडिक यांनी जाहीर केले होते. गेल्या आठवड्यात जि. प. चे माजी सदस्य सम्राट महाडिक  शिराळ्यात लढणार असे जाहीर झाले आहे. त्यामुळे आता ‘इस्लामपुरा’त महाडिक गटाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भाजपमध्ये इच्छुकांत चुरस असली तरी  युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे हा मतदारसंघ  आहे.  जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व  अभिजीत पाटील यांची नावे पुढे आहेत.  तूर्त तरी विरोधकांमध्येच उमेदवारीवरून  संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गुंतवून ठेवण्याचा डाव

भाजप इथली जागा घेऊन मातब्बर उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहे. जयंत पाटील यांना मतदारसंघातच गुंतवून ठेवण्यासाठी भाजपकडून ना. खोत यांच्या पुुढाकाराने  प्रयत्न सुरू आहेत.