होमपेज › Sangli › इस्लामपूरसह तालुक्यात डेंग्यूचे थैमान

इस्लामपूरसह तालुक्यात डेंग्यूचे थैमान

Last Updated: Nov 02 2019 10:01PM

संग्रहित फोटोइस्लामपूर : संदीप माने

वाळवा तालुक्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. शहरातील दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यू साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. 
गेल्या चार महिन्यांपासून तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. इस्लामपूर शहरातील दवाखाने डेंग्यूसदृश्य रुग्णांनी भरले आहेत. तालुक्यातील नेर्ले, बोरगाव, केदारवाडी, काळमवाडी, पेठ, महादेववाडी, वाटेगाव, कासेगाव आदी गावात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. अहिरवाडी, गोटखिंडी, बहादूरवाडी, येडेनिपाणी या ठिकाणी डेंंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. इस्लामपूर शहरात गांधी चौक, उरूण परिसर, महादेवनगर परिसर, शिवनगर आदी भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. 

सतत पडणारा पाऊस यामुळे शहरात डबकी साचली आहेत. अनेक ठिकाणी इमारतीची कामे सुरू आहेत. तळमजल्यामध्ये पाणी साचल्याने त्या ठिकाणी डासांच्या अळ्यांची पैदास होत आहे. तालुक्यात डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी शहरातील डेंग्यूची साथ आटोक्यात आलेली नाही. शहरात औषध फवारणी करणे गरजेचे आहे. 

तालुक्यातील ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढते आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने याकडे कानाडोळा केला आहे. औषध फवारणी, पावडर फवारणी केली जात नसल्याचा नागरिकांचा सूर आहे. धूर फवारणी यंत्रे धूळ खात पडली आहेत. डेंग्यूची लागण नगरपालिकेचे, ग्रामपंचायतीचे पदाधिकार्‍यांच्या कुटुंबांनाही झाली आहे. 

इस्लामपुरात प्लेटलेटस् तुटवडा...
रुग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली  ठेवावे लागते.  डेंग्यूवरचे उपचार महागडे आहेत. रक्तातील प्लेटलेटस् संख्या 40 हजारांच्या आत आल्यानंतर रुग्णाला प्लेटलेटस् द्याव्या लागतात.  त्याचा खर्च सामान्यांना न परवडणारा आहे. यातच इस्लामपुरातील रक्तपेढीमध्ये प्लेटलेटस्चा तुटवडा जाणवू लागल्याने बाहेरून प्लेटलेटस् मागवाव्या लागत आहेत. 

आरोग्य विभागाकडून सर्व्हेचे काम सुरू आहे. पाण्यातील डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीमार्फत गावागावात औषध फवारणी केली जात आहे. काही भागातील डेंग्यूची साथ आटोक्यात आली आहे. 
- डॉ. साकेत पाटील
वाळवा तालुका आरोग्य अधिकारी.