शिराळा : विठ्ठल नलवडे
शिराळा डोंगरी तालुक्यातील शेतकरी वारणा व मोरणा नदीस आलेल्या महापुर व अतिवृष्टीमुळे शेतकरी बंधूचे कंबरडे मोडले असून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. शिराळा तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतीचे व घरांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. परंतु सरकारकडून मदत मात्र तुटपुंजी मिळत आहे. घर, शेतीचे नुकसान व जनावरे गेली या मुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. आधिच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यातून बाहेर कसे पडायचे याची चिंता शेतकरी बंधुना लागली आहे.
शिराळा तालुक्यातील २१ गावांना पुराचा फटका बसला आहे. तर तालुक्यातील उर्वरित गावांतील शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पाऊस व पुरामुळे ६१३ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते. कुटुंबातील सर्व लोक परतले असुन स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे २० जनावरांचा मृत्यू झाला होता. तर २७ पुर्णतः व ९८२ घरांची अंशतः पडझड झाली आहे.
पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा ओघ आजुनही सुरूच आहे. प्रशासनामार्फत पूर ओसरल्यावर साथीचे रोग पसरू नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिके पाण्याखाली राहिली असलेने तसेच शेती चे बांध वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जवळपास वीस हजार हेक्टर क्षेत्रातील पिंकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने आता स्वच्छतेची दुसरी फेरी सुरू केली आहे. वीज पुरवठा व पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला आहे.
नऊ दिवस तालुक्यात अतिवृष्टी सुरू होती त्यामुळे वारणा व मोरणा नद्या, ओढे दुथडी भरून वाहत होत्या त्यामुळे तालुक्यात वारणा नदी काठावरील गावामध्ये महापुराचे संकट आले होते. यामुळे २१ गावातील ६१३ कुटुंबातील ३०५४नागरिक व २८१५ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले होते आता नागरिक स्वगृही परतले आहेत.या पुरामध्ये २० जनावरे मृत्यू मुखी पडले आहेत.६१३ कुटुंबाना ५हजार रुपये रोख व ५ हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. याचबरोबर शासनाने १० किलो तांदूळ ,१० किलो गहू ,पाच लिटर रॉकेल व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या जीवनावश्यक वस्तू चे किट वाटप करण्यात आले आहेत. घरांच्या पडझडीसाठी अद्याप मदत देण्यात आलेली नाही.
पुरामुळे १० गाई , ४ कालवड व ६ म्हैशी असे एकूण २० जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. याना ५लाख ७६ हजार रुपये तसेच ६१३ कुटुंबाना ६१ लाख ३० हजार असा एकूण ६७ लाख ६ हजार रुपये मदत निधी वाटप करण्यात आला. तालुका व तालुका बाहेरील अनेक सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्था , नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात मदत दिली आहे. तहसीलदार गणेश शिंदे , गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल , सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील , दत्तात्रय कदम व त्यांचे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्गाने यांनी स्वतः नागरिकांना मदतीबरोबर घरे स्वच्छते साठी मदत केली.