होमपेज › Sangli › देशमुख यांचा राजीनामा रात्रीत मंजूर

देशमुख यांचा राजीनामा रात्रीत मंजूर

Published On: Sep 16 2019 1:38AM | Last Updated: Sep 15 2019 10:52PM
सांगली : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख यांचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा शनिवारी रात्रीच मंजूर झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे राजीनामा सादर झाला. त्यांनी राजीनामा पत्राची पडताळणी केली. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी राजीनामा मंजूर केला.

सत्यजित देशमुख यांच्या राजीनामा पत्रावर जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती अरुण राजमाने व सदस्या शारदा पाटील यांची साक्षीदार म्हणून सही आहे. राजमाने भाजपचे आहेत, तर शारदा पाटील काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. 

देशमुख यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बोलणी सुरू असल्याची चर्चाही होती. मात्र अधिकृत भूमिका जाहीर केली जात नव्हती. अखेर देशमुख यांनी रविवारी शिराळा येथे मेळावा घेऊन भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी देशमुख यांनी शनिवारी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केले होते. 

शनिवारी सायंकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व खासदार संजय पाटील यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना फोन आला. सत्यजित देशमुख जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून प्रकिया पूर्ण करून घेण्याबाबत सांगितले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास   राजीनामा पत्राचा अधिकृत नमुना प्राप्त केला.  देशमुख यांनी राजीनामा पत्रावर सही केली. राजीनामा पत्रावर दोन सदस्यांची साक्षीदार म्हणून सही लागते. राजमाने व पाटील यांची सही घेऊन राजीनामा पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांना सादर केले. त्यांनी पडताळणी केली व अध्यक्ष देशमुख यांच्याकडे राजीनामा पत्र पाठविले. देशमुख यांनी राजीनामा मंजूर केला. ही सर्व प्रक्रिया रात्रीत पार पडली. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दि. 9 सप्टेंबररोजी झाली. या सभेला सत्यजित देशमुख उपस्थित नव्हते. त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली होती. अखेर देशमुख यांनी प्रत्यक्ष भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला व जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामाही दिला.  देशमुख काँग्रेसचे गटनेते होते. सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते आहेत.  त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सर्व धुरा आता पक्षप्रतोद जितेंद्र पाटील यांच्या खांद्यावर आली आहे.