Mon, Jul 13, 2020 22:10होमपेज › Sangli › उद्यापासून रंगणार विधानसभेचे रणांगण

उद्यापासून रंगणार विधानसभेचे रणांगण

Published On: Sep 29 2019 1:20AM | Last Updated: Sep 28 2019 11:33PM
सांगली ः अमृत चौगुले

जिल्ह्यातील आठही मतदार संघांमध्ये सर्वच पक्षांत इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पण अद्याप महायुतीचे घोडे गंगेत न्हालेले नाही. जिल्ह्यात भाजप प्रबळ असला तरी महायुती होणार, न होणार, त्यातून कोण-कोणत्या पक्षांतून उभारणार याबाबत संभम्राची स्थिती आहे.त्यावर सर्वच मतदारसंघांत निवडणुकीची राजकीय समीकरणे ठरणार आहेत. सोमवारपर्यंत (दि. 30) याचा फैसला आणि त्यातून लढतीचे चित्रही स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घटस्थापनेनंतर सोमवारपासूनच निवडणुकीचे रणांगण खर्‍या अर्थाने रंगणार आहे.

दि. 21 सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली आहे.दि. 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरायचे  आहेत. मतदान दि. 21 ऑक्टोबरला होणार असल्याने निवडणूक कालावधी कमी आहे. त्यासाठी सर्वच पक्षांतून इच्छुकांसह कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. वास्तविक कालावधी कमी असल्याने उमेदवारी आणि प्रचाराला गती यायला हवी, पण अद्याप उमेदवारीच निश्‍चित नसल्याने अपवाद वगळता सर्वत्र सामसूम आहे. 

जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने भाजप-सेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह अन्य पक्षांमध्ये लढत आहे. परंतु सर्वच पक्षांकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीत जिल्ह्यातील जागा वाटपाचाही अद्याप घोळ कायम आहे. 

दुसरीकडे भाजप - सेनेचीही अद्याप युती जाहीर नाही. त्यामुळे कुणाला कोणत्या जागा वाटपात मिळणार, ते स्पष्ट नाही. सांगलीची जागा काँग्रेस आणि भाजपकडे आहे. मात्र, तेथेही विद्यमान, माजी आमदारासह अनेकजण इच्छुक आहेत. काँग्रेसमध्येही इच्छुकांची गर्दी आहे. राष्ट्रवादीकडूनही काहीजण इच्छुक होते. पण त्या पक्षात शुकशुकाट आहे. वंचित बहुजन आघाडीसह अन्य पक्षांकडूनही कोणत्याच हालचाली नाहीत.

मिरजेतही भाजपविरुद्ध अन्य पक्ष लढणाक आहेत. पण तेथेही कोण मैदानात उतरणार, हे स्पष्ट नाही.  तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ परंपरागतरित्या शिवसेनेकडे असला तरी तिथे भाजपमध्येच रससीखेच आहे. न राष्ट्रवादीचे उमेदवार निश्‍चित असले तरी   त्या पक्षाच्या आघाडीवरही  शांतताच आहे. भाजपचा उमेदवार निश्‍चित झाल्याशिवाय लढतीत खरी रंगत येणार नाही.

खानापूर-आटपाडी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. विद्यमान आमदार शिवसेनेचे असले तरी अद्याप काँग्रेसकडून उमेदवार निश्‍चित नाही. सोबतच भाजपच्या युतीचा फैसला नाही. तो झाल्यावरच लढत कशी होणार, ते ठरणार आहे. प्रसंगी  तिरंगी, चौरंगी लढतही होऊ शकेल.

जतमध्येही विद्यमान आमदारांसह भाजपमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. त्यातून उमेदवारीत शह-काटशहाचे राजकारण मुंबईपर्यंत रंगले आहे. त्यातच काँग्रेसकडूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही.  वंचित आघाडी आणि अन्य फॅक्टरही निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे तेथेही अद्याप चित्र निश्‍चित नाही. पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस-भाजप लढत निश्‍चित आहे. काँग्रेसकडून उमेदवारीही जाहीर झाली आहे. भाजपची अद्याप यादी जाहीर नसली तरी  दोघांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे,  पण अर्ज भरल्यानंतरच रंगत येईल. 

शिराळ्यातही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत निश्‍चित आहे. पण अद्याप भाजपकडून उमेदवार निश्‍चित नाही. उमेदवारीत रस्सीखेच सुरू आहे. ती जाहीर झाल्यानंतर प्रसंगी बंडखोरी, तिरंगी लढती आणि गावनिहाय मतविभागणीची रंगत चुरस वाढविणारी ठरेल. 

इस्लामपुरातही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी चुरस होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप भाजपचा उमेदवार निश्‍चित नाही. त्यातून गटबाजी आणि वाद सुरू आहे. तो वाद  मिटला तरच तिथे तुल्यबळ लढत होऊ शकते. 

पितृपक्ष पंधरावड्याचा अडसर...

पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही राजकारण्यांचा भविष्य आणि मुहूर्तावर अधिक विश्‍वास असल्याचे दिसून येते. वास्तविक निवडणुकीचा कालावधी महिनाभर आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर होऊन दहा दिवस झाले तरी अद्याप उमेदवारी आणि अर्ज भरण्याचा घोळ मिटलेला नाही. पितृपक्ष पंधरवडाही सुरू होता. त्यामुळे पक्ष आणि नेत्यांनीही हा कालावधी वाया घालविला. आता तो संपल्यानंतर लगीनघाई सुरू होणार आहे.