Sun, Jul 05, 2020 14:43होमपेज › Sangli › बंडोबांची मोट; पक्षांना झटका

बंडोबांची मोट; पक्षांना झटका

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 8:18PMसांगली ः अमृत चौगुले

महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने आता सर्वपक्षीय विरोधकांनी एकीची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.  प्रस्थापितांना उमेदवारी देऊन सर्वच पक्षांतून अन्याय झाल्याचा रोष आता यातून व्यक्त होऊ लागला आहे. सर्वच पक्षांनी या बंडखोरीला रोखण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत. पण ते न थोपविल्यास हा बंडोबा सर्वच पक्षांना प्रसंगी मोठी नुसतीच डोकेदुखी नव्हे तर दे धक्का देणारा ठरेल. प्रसंगी हा बंडखोरांच्या आघाडी पॅनेलचा पॅटर्न यशस्वी झाल्यास तो एक पॅटर्न म्हणून प्रचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणतीही निवडणूक म्हटली की साहजिकच पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरच त्याची मोर्चेबांधणी होत असते. त्यासाठी ते वर्षानुवर्षे राबत असतात. ते संघटन  मजबूत हवे असते. त्या माध्यमातून जनतेच्या सोयी - सुविधा आणि विकासासाठी धावणारी कार्यकर्त्यांची फळी मजबूत त्यावरच निवडणुकीचे यश अवलंबून असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक निवडणुकीत त्या-त्या टर्ममध्ये झालेल्या कामांचे मूल्यमापन होत असते. त्यावरच  योग्य उमेदवारांना संधी दिल्यास पक्षाला जास्तीत जास्त यश मिळते. 

अर्थात निवडणुकीत ही बाजू असली तरी दुसरीकडे सक्षम आणि ताकदीचे आयात उमेदवार हा फंडा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळेच निष्ठावंतांवर अन्यायाची तक्रार होत असल्याची परंपरा प्रत्येक निवडणुकीत सुरूच असते. साहजिकच उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदियाळी जमवायची, त्यातून पक्षाच्या आणि नेत्यांच्या सोयीनुसार उमेदवारी दिल्या जात असल्याचे आरोप नाराजांतून व्यक्‍त होत आहेत. 

या महापालिका निवडणुकीत तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणीच फिरले. वास्तविक आघाडीतून प्रस्थापित, बड्यांना, वशिलेबाजीने संधी आणि निष्ठावंतांवर अन्याय होणार असा पहिल्यापासून सूर होता. त्यामुळे  आघाडी होऊच नये अशी अनेकांची अपेक्षा होती. त्यासाठी नेत्यांनाही अनेकांनी साकडे घातले होते. पण भाजपला रोखण्यासाठी आघाडीचा निर्णय झाला आणि दोन्हींकडून स्वतंत्र 78 जणांना मिळणारी संधी एकाच आघाडीत समाविष्ट झाली. 

साहजिकच यामध्ये जागावाटप आणि संधीबाबत दोन्ही पक्षांकडून खल सुरूच राहिला. दुसरीकडे भाजपकडे कोणी जाऊ नयेत यासाठी खबरदारी घेत गोपनीयता बाळगण्यात आली. भाजपने तर शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी दारे खुली असे जाहीर केले होते. त्यामुळे तेथेही निष्ठावंतांवर अन्यायाचा सूर सुरूच होता. शिवसेनेतही अशाच पद्धतीने कमी प्रमाणात का होईना नाराजी होतीच. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ती समोरही आली. पण ही नाराजी कधी नव्हे एवढ्या प्रमाणात संघटित झाली आहे. 

सर्वच पक्षांकडून आता नाराजी दूर करून पक्षाला तोटा होऊ नये यासाठी बंडोबांना शांत करण्यासाठी सर्वतोपरी हालचालीही सुरू झाल्या आहेत. त्यात कितपत यश येणार हा भाग निराळा.

पण आता नाराजांनीच प्रस्थापित आणि पक्षांच्याविरोधात निष्ठावंतांची मोट बांधण्यास सुरू केली आहे. ती फक्‍त एका पक्षापुरती नव्हे तर त्याला सर्वपक्षीय स्वरूप देण्यात आले आहे. पहिल्याच बैठकीत 50 हून अधिकजणांनी एकत्र येऊन प्रस्थापितांविरोधात जणू एल्गारच पुकारला आहे. यातून अपक्षांच्या पॅनेलचाही निर्धार केला आहे. 

प्रत्येक प्रभागात सर्वच पक्षांविरोधात समन्वयाने पॅनेल उभारण्यासाठी व्यूहरचनाही सुरू केली आहे. साहजिकच सर्व पक्षांच्या चौकटीबाहेर झालेली ही अपक्षांची आघाडी मतदारांनाही सक्षम पर्याय ठरू शकते. एवढेच नव्हे तर यामध्ये असलेले अनेक अपक्ष तेवढेच तुल्यबळ आणि ताकदवान आहेत. शिवाय निष्ठावंतांना डावलल्याचा रोष जनतेतूनही मतांद्वारे एकवटू शकतो. तो पक्षविरहीत शहराच्या विकासाचा पर्यायही ठरू शकतो असा या आघाडीच्या नेत्यांचा दावा आहे. 

राजकारणातील हा एक आगळा-वेगळा पॅटर्न अनेक भल्या-भल्या राजकीय समीकरणांना धक्का देणारा ठरेल.  त्यामुळे ही खर्‍या अर्थाने मक्‍तेदारीचे राजकारण करणार्‍या नेत्यांना आणि त्यांच्या सर्वच पक्षांच्या कारभार्‍यांना धोक्याची घंटाच आहे.