Thu, Jul 02, 2020 11:13होमपेज › Sangli › महापालिका वॉटर एटीएमची ठेकेदारी

महापालिका वॉटर एटीएमची ठेकेदारी

Published On: Oct 21 2018 2:21AM | Last Updated: Oct 20 2018 11:24PMसांगली : प्रतिनिधी

येथील शास्त्री उद्यानातील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज वॉटर एटीएमचा खासगी ठेका देण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि. 25) होणार्‍या स्थायी समितीसमोर पाण्याची दरवाढ करून ठेका देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावरून सभा वादळी होण्याची शक्यता आहे. 

महापालिकेने गेल्या मे 2016 मध्ये एसटी बसस्थानक परिसरातील शास्त्री उद्यानात प्रायोगिक तत्वावर वॉटर एटीएम बसविले होते. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून 14 लाखांचा निधी मिळाला होता. एक महिना कंपनीकडून हे मशिन चालवून देखभाल व दुरूस्ती केली जात होती. त्यानंतर महापालिकेच्यावतीने हे वॉटर एटीएम चालविले जात आहे. ते वॉटर एटीएम वारंवार बंदच अवस्थेत असते. 

या वॉटर एटीएमच्या मशिनची देखभाल दुरूस्ती व वीज बिलापोटी महापालिकेच्या तिजोरीवर महिन्याला सुमारे 35 ते 40 हजार रूपयांचा बोजा पडतो. गेल्या दोन वर्षांपासून अनेकवेळा हे मशिन बंद पडत असते. कर्मचारी देखील त्या तुलनेत सक्षम नाहीत. त्यामुळे महापालिकेने हे वॉटर एटीएम न चालवताना ठेका द्यावा, अशी मागणी तत्कालिन काँग्रेस सत्तेच्या काळात झाली होती.  निविदा प्रक्रिया देखील राबवली होती. परंतु एटीएमवरून भाजपचे गटनेते युवराज बावडेकर व माजी नगरसेवक गौतम पवार यांचा महासभेत वाद झाला होता. त्यानंतर वॉटर एटीएमचा हा विषय रेंगाळला होता. 
आता भाजप सत्तेत  स्थायी समितीच्या सभेत पुन्हा हा विषय आणला आहे. वॉटर एटीएमचा खर्च महापालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे हे एटीएम चालविण्यासाठी तीन वर्षांसाठी ठेकेदाराची नेमणूक करण्याचा विषय सभेपुढे आला आहे. 

ठेकेदारासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात वॉटर एटीएम देखभाल दुरूस्तीच्या हेडमधून रक्कम खर्च केली जाणार आहे. यावरून स्थायीत वादळी चर्चा होणार आहे. तसेच पूरनियंत्रण व्यवस्था अंतर्गत कर्नाळ रस्ता ते शिंदे मळा, शामरावनगर परिसरामध्ये वितरण व्यवस्था करणे व सांगलीवाडी कोल्हापूर रस्ता येथे गुरूत्वनलिका टाकणे व वितरण व्यवस्था करण्यासाठी ठाणे येथील कंपनीला भाववाढ न देता मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या सभेत आला आहे. यावर देखील वादळी चर्चा होणार आहे. 

पाच रुपयांना 20 लिटर पाण्याचा प्रस्ताव

महापालिकेकडून सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत वॉटर एटीएम सुरू होते. मात्र ठेकेदाराला 24 तास सेवा देण्याची अट घालण्यात येणार आहे. मात्र प्रशासनाचा पाण्याच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या एक रूपयाला दहा लिटर पाणी देण्यात येते. मात्र यात दरवाढ करून दोन रूपयाला दहा लिटर पाणी देण्यात येणार आहे. तसेच पाच रूपयाला वीस लिटर पाणी देण्यात येणार आहे. यासाठी दोन व पाच रुपयांचे नाणे वापरावे लागणार आहे.