होमपेज › Sangli › सांगली : भरधाव मोटारीची दुचाकीला धडक, एक ठार

सांगली : भरधाव मोटारीची दुचाकीला धडक, एक ठार

Published On: Jun 05 2018 2:29PM | Last Updated: Jun 05 2018 2:29PMसांगली : प्रतिनिधी

दुचाकी आणि चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. सांगलीवाडी) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुरेश तातोबा कांबळे (वय ५५, रा. कवठेपिरान, ता. मिरज) हे गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवार दि. ५ रोजी सकाळी ९ वाजता सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावर हा अपघात झाला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून चारचाकी मोटारीसह चालक धीरज वसंत धनवडे (वय २१, रा. राजर्षी शाहू कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत ज्ञानेश्वर पाटील हे लष्करात कॅप्टन होते. ते सुमारे २० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. गणपती पंचायतन ट्रस्टचे सुरक्षा रक्षक प्रमुख म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले होते. पाटील हे सांगलीवाडीमध्ये तर कांबळे हे कवठेपिरान येथे राहत होते. सोमवारी सकाळी ते दोघे दुचाकी क्र मांक (एमएच १० टी ६६८१) वरुन सांगलीवाडीमधून माधवनगरच्या दिशेने निघाले होते. कांबळे हे दुचाकी चालवत होते.
दुचाकी सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावर आल्यानंतर सांगलीच्या दिशेने भरधाव वेगाने चारचाकी मोटार क्र मांक (एमएच ०९ ईयू १४३८) ही येत होती. पुलावर आल्यानंतर वेगात असलेल्या चारचाकीने दुचाकीला समोरील बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर असलेले पाटील हे जागीच ठार झाले. तर कांबळे हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती समजल्यानंतर सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पंचनामा करुन पोलिसांनी चारचाकी मोटार आणि चालक धीरज धनवडे याला ताब्यात घेतले. पाटील यांचा मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेण्‍यात आला. पाटील यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर उत्तरीय तपासणी करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

बहिणीला सोडून आला... अन् दुचाकीला ठोकरला
चारचाकी चालवणारा धीरज धनवडे याची बहिण कवलापूर येथे दंत महाविद्यालयात शिकत आहे. तो तिला कवलापूर येथे सोडण्यासाठी आला होता. तिला सोडल्यानंतर चारचाकीतून तो भरधाव वेगाने सांगलीच्या दिशेने येत होता. रेल्वे पुलावर आल्यानंतरही त्याच्या वाहनाचा वेग जास्त होता. चारचाकीने दुचाकीला धडक दिल्यानंतर सुमारे ५० फूट अंतरावर जावून चारचाकी थांबली. नागरिकांनी गर्दी केल्यानंतर चालकाला ताब्यात घेतले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.