Mon, Sep 16, 2019 11:43होमपेज › Sangli › स्मरण पानिपतचे.. सदाशिवभाऊंच्या समाधीचा शोध

स्मरण पानिपतचे: मराठ्यांचे सेनापती सदाशिवराव पेशवेंच्या समाधीचा शोध

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 11:24AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

मराठेशाहीच्या इतिहासात पानिपतच्या लढाईस मोठे महत्व आहे. या लढाईस रविवारी (दि. 14 जानेवारी) 257 वर्षे पूर्ण होत आहेत. या लढाईत धारातीर्थी पडलेले सेनापती  सदाशिवरावभाऊ पेशवे यांची समाधी हरियाणातील सिंघी (जि. रोहटक) या गावी आढळली आहे. सध्या नाथपंथीय मठाचे स्वरुप असलेल्या या समाधीच्या अंतर्भागात भाऊंची समाधी व शेजारी त्यांची मूर्ती स्थापन केलेली आहे, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक व शासनाच्या पुरातत्व विभागाच्या बृहत आराखडा समितीचे तज्ज्ञ सदस्य अभियंते प्रवीणचंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोसले म्हणाले, मराठ्यांच्या इतिहासातील थोर सेनापतींच्या समाधींचा शोध घेणे, हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. त्यासाठी गेली दोन दशके भटकंती सुरू आहे. पानिपतच्या लढाईच्या अनुषंगाने माझी शोधयात्रा उत्तरेत झाली. त्यातून नवी माहिती समोर आली. सदाशिवरावभाऊंच्या समाधीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हरियाणातील सिंघी या गावी सदाशिवरावभाऊंच्या समाधीचे दर्शन झाले. नाथपंथीय मठाचे स्वरूप असलेल्या या समाधीच्या अंतर्भागात भाऊंची समाधी आहे. मठावर लिखाण केलेले स्थानिक शिक्षणाधिकारी हुडा व मठातील पूर्वापार ठेवलेल्या नोंदीनुसार हा मठ प्रत्यक्ष भाऊंनी स्थापन केलेला आहे. मठातील समाधी ही भाऊंची आहे, असे स्थानिकही मानतात. 

हिंदुस्थानच्या रक्षणासाठी पानिपतच्या लढाईत राष्ट्रीय भावनेने  मराठे  लढले. सेनापती सदशिवराव भाऊ, नानासाहेब पेशव्यांचे पुत्र विश्‍वासराव, अटकेपार भगवा फडकवणारे मानाजी पायगुडे, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे, बळवंतराव मेहंदळे, यशवंतराव पवार, खंडेराव निंबाळकर, संताजी वाघ, सखोजी जाधव, सिधोजी घाटगे, राणोजी भोई, सोनजी भापकर, इब्राहिमखान गारदी हे मराठा साम्राज्याचे प्रमुख मोहरे मारले गेले.

पानिपतच्या लढाईच्या स्मरणाच्या निमित्ताने दुर्लक्षित, उपेक्षित मराठा वीरांच्या पराक्रमाचेही स्मरण व्हायला हवे. हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुर्जर, शिवा काशिद, बहिर्जी नाईक यांच्या समाधींचा अपवाद वगळता अन्य पराक्रमी वीरांच्या समाधी उपेक्षित, दुर्लक्षित आहेत. शिवछत्रपतींचे पंचहजारी सेनानी असलेले सिधोजीराव निंबाळकर हे पट्टा किल्ल्या जवळच्या (ता. अकोले, जि. नगर) संग्रामात मारले गेले. पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांची समाधी आहे. ही समाधी सिधोजीरावांचीच आहे हे स्पष्ट होत आहे. 

नागपूर - गोंडवनचा कब्जा मिळविणार्‍या परसोजी भोसले यांची समाधी सातार्‍याजवळ खेड माहुली गावात आहे. सेनापती संताजी घोरपडे यांची कारखेल, कापशी येथील समाधी  माहित आहे, पण संताजींची हत्या झालेल्या कन्हेर या ठिकाणची समाधी अज्ञात होती. रामजी पांगेरा, बापू गोखले, संभाजी कावजी कोंढाळकर, नेताजी पालकर यांचीही समाधी दुर्लक्षित आहे. हरजीराजे महाडिक, कोंडाजी फर्जंद, राणोजी शिंदे, विठोजी चव्हाण यांची स्मारके, समाधी दिसत नाहीत. तीनशेहून अधिक पराक्रमी वीरांची समाधीस्थाने उपेक्षित आहेत. गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबरच या प्रेरणास्थानांचा जीर्णोद्धारही आवश्यक आहे, असे भोसले यांनी सांगितले. 

दिल्लीजवळील बुराडी घाट हे दत्ताजीरावांचे स्मारक व्हावे

देशासाठी मरण पत्करण्याची तयारी तत्कालीन भारतात मराठ्यांनी सर्वप्रथम दाखविली. त्याची सुरूवात दत्ताजी शिंदे यांच्यापासून झाली.  दिल्लीजवळ बुराडी घाटावर मारल्या गेलेल्या दत्ताजी शिंदे यांची समाधी शोधण्यासाठी शिवपुरी, उज्जैन, ग्वाल्हेर या ठिकाणांना भेटी दिल्या. मात्र दत्ताजीरावांची समाधी अस्तित्वात नाही. बुराडी घाट हेच त्यांचे स्मारक ठरायला हवे, असे  भोसले यांनी सांगितले.