Wed, Jul 08, 2020 17:25होमपेज › Sangli › ब्लॉग: महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट

ब्लॉग: महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:59AM

बुकमार्क करा
सांगली : अमृत चौगुले

जूनमध्ये होणार्‍या सां. मि. कु. महापालिका निवडणुकीचे बिगुल आतापासूनच वाजू लागले आहे. त्यादृष्टीने सर्वपक्षीयांनी बाह्या सरसावल्या आहेत. अर्थात गुजरात निवडणूक आणि राज्यभरात, देशभरात असलेल्या वातावरणामुळे भाजप थोडा बॅकफूटवर असला तरी महापालिका निवडणुकीत बाजी मारूच, असा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचीही या निवडणुकीत कसोटी आहे. दोघांची आघाडी भाजपसमोर महाकाय आव्हान ठरू शकते. त्यातूनही त्यांच्यातील असंतुष्टांवरच भाजपची मदार आहे. त्यावरच महापालिकेच्या सत्तेचा निकाल लागणार आहे. एवढेच नव्हे तर मनपा  निवडणूक आणि त्याचा निकाल खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जिल्हा सुधार समितीसह आघाड्या, संघटनांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सत्ताधारी काँग्रेससाठी पुन्हा सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे.  

वास्तविक एकेकाळी राज्याला नेतृत्व देणारा सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. येथे भाजपला पाय ठेवायलाही जागा नव्हती. पण  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही गेल्या दोन-तीन वर्षांत लोकसभा, विधानसभेपाठोपाठ स्थानिक निवडणुकांतही भाजपचा वारू बेफाम आहे. सांगलीतही भाजपने कधी नव्हे एवढे यश पहिल्यांदा मिळविले. काँग्रेस-राष्ट्रवादीची धूळधाण झाली. अर्थात हे यश काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात कलेल्यांंमुळे, अंतर्गत कुरघोड्यांतून भाजपला सहकार्यामुळे मिळाले. त्यानंतर मात्र नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये त्या आधारे भाजपने पाय रोवले आहेत. 

फक्‍त सांगली महापालिकेचा गड मात्र भाजपच्या हातात नाही. त्यादृष्टीने आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पण भाजपचा हा अश्‍वमेध रोखण्यासाठी आणि पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी सावध झाला आहे. यादृष्टीने नेत्यांनीही खबरदारी घेतली आहे. महापालिका निवडणूक यादृष्टीने महत्त्वपूर्ण लढाई आहे. यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशिवाय पर्याय नाही, अशी मानसिकता दोन्ही पक्षांकडून झाली आहे. 

यासाठी काँग्रेसनेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांनी एकत्र यावे, अशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. दोघे एकत्र आल्याशिवाय आता भाजपला रोखणे शक्य नाही, एकत्र आलो तर बहुमत अवघड नाही, असा दावाही केला जात आहे. यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचीही डॉ. कदम यांच्याशी चर्चा झाल्याचे समजते. दोघांनाही गतवैभव प्राप्त करण्यासाठी आता रात्र वैर्‍याची समजून एकसंधपणे आघाडीतून निवडणूक लढण्याची तयारीही सुरू झाल्याची चर्चा आहे. परंतु यामध्ये माजी खासदार प्रतीक पाटील, विशाल पाटील यांच्यासह गटाची भूमिकाही महत्त्वाची आहे.  त्यादृष्टीने विशाल पाटील यांनी आता हालचाली सुरू केल्याने काँग्रेसअंतर्गत त्यांची एकीही महत्त्वाची आहे.

भाजपने जरी महापालिका जिंकणारच, अशा अविर्भावात जोर-बैठका सुरू केल्या आहेत. शिवसेनेनेही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने सत्तेचा दावा केला तरी त्यांना मर्यादा आहेत. मूळ भाजपचे मतदान मर्यादित आहे. त्यामुळे जुन्याच फॉर्म्युल्याने  त्यांची संपूर्ण मदार ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या असंतुष्टांवरच राहणार आहे. त्याशिवाय भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर देऊच शकत नाही. त्यामुळे याची सर्व सूत्रे आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच घेतली आहेत. आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांचीही साथ आहेच. त्यांच्या साथीने श्री. पाटील यांना पश्‍चिम महाराष्ट्राचे नेते या नात्याने त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. पक्षश्रेष्ठींसमोर आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी महापालिकेत त्यांना भाजपचाच झेंडा फडकविणे गरजचेे आहे. 

सरपंच, नगराध्यक्षांप्रमाणे थेट महापौर
अर्थात भाजपने पाय पसरले तरी स्थानिकपातळीवर पोहोचली नसल्याने थेट सरपंच, नगराध्यक्ष हा फॉर्म्युला सत्तेसाठी त्यांना फायद्याचा ठरला. यामुळेच अनेक ठिकाणी बहुमत काँग्रेस-राष्ट्रवादीकडे असले तरी इस्लामपूरप्रमाणे अन्य नगरपालिकांत नगराध्यक्ष, ग्रामपंचायतींचे सरपंच भाजपचे आहेत. याच पद्धतीने महापौरपदाबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीनेही मुख्यमंत्र्यांनी तसे सूतोवाचही केले होते. आता नव्याने होणार्‍या प्रभागरचनेबरोबरच थेट महापौरपदाच्या थेट निवडणुकीवर शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याची सुरुवात सांगली महापालिकेपासून होऊ शकते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली, बहुमत झाले  तरी थेट महापौरपदाचा निर्णय झाल्यास किमान या पदाद्वारे महापालिकेचा गड हातात येईल, अशी स्वप्ने रंगविली आहेत. भाजपने त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

महापौरपद : दोन विधानसभांची ताकद
अर्थात या महापालिकेत सांगली व मिरज दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे महापौरपद हे दोन आमदारांच्या ताकदीचे असू शकते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांचीही रस्सीखेच कमी होणार आहे. अर्थात थेट महापौरपदामुळे सर्वच पक्षांचे दिग्गज नेतेही स्वत:च मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. पण सध्याचे महापौरपद हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. थेट महापौरपदाच्या निर्णयानंतर ते कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते यावर त्याचा फैसला अवलंबून आहे. 

काँग्रेसअंतर्गत गटबाजीतून  उपमहापौर गट अस्तित्वात आला. त्यातून शिवसेनेत प्रवेश केलेले उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, दिगंबर जाधव यांनीही शिवसेनेच्या माध्यमातून वेगळे आव्हान उभे केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य शिवसेनेचे नेतेही सांगलीत आले होते. याच दरम्यान काही आजी-माजी नगरसेवक वाटेवर असल्याचा दावा आहे. त्यामुळे हा वेगळा गटही महापालिकेतील नगरसेवकांच्या जागांत वाटेकरी ठरणार आहे. त्यानुसार सत्तेचा सारिपाट रंगेल.

एकूणच ही  निवडणूक आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीची पूर्वपरीक्षाच आहे. या निवडणुकीचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा ठरू शकतो. येथे जर भाजपचा अश्‍वमेध रोखला तर सहा महिने-वर्षभरात होणारी लोकसभा, विधानसभा  निवडणुका प्रसंगी दोन्ही एकत्र झाल्यास भाजपला जड ठरू शकते.  पण जर भाजपला  यश आले, तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा नेस्तनाबूत होईल. भाजपचा अश्‍वमेध कोणीच रोखू शकणार नाही. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘टर्निंग पॉईंट’च ठरणार आहे. 

मिशन महापालिकेसाठी मुंबई, दिल्लीची रसद
महाराष्ट्राला नेतृत्व देण्याचे, प्रसंगी मुख्यमंत्री ठरविण्याचे काम सांगली जिल्ह्याने केले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्याला (विधानसभा निवडणुकीत जनतेतून आलेल्या नेतृत्वाला) स्थान नाही, असे कधीच झाले नव्हते. पण यावेळी मात्र भरभरून देऊनही भाजपने सांगलीला सवतासुभा दाखविला. पण तरीही हे सत्ताकेंद्र महत्त्वाचे आहे, हे भाजपसह सर्वच पक्षांना मान्य आहे. त्यामुळे भाजपने सांगली महापालिकेचा गड जिंकण्यासाठी आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शड्डू ठोकला आहेच. प्रसंगी मुंबई आणि दिल्लीकडूनही ‘रसद’ पुरविली जाणार हे स्पष्ट आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील तुल्यबळ आहेतच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेचे स्वत:च रणशिंग फुंकले होते. आता ठाणेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगलीचे पालकत्व दिले आहे. शिवसनेकडूनही त्यादृष्टीने गटबांधणी सुरू आहेच. त्यानुसार श्री. शिंदे ठाणे पॅटर्ननुसार निवडणुकीत ताकद लावणार आहेत. एकूणच कधी नव्हे एवढी ताकद लावून सर्व पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच बनविला आहे.

स्थानिक आघाड्यांचीही उडी ठरणार निर्णायक..
महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पंचनामा करीत जिल्हा सुधार समितीने गेली तीन-साडेतीन वर्षे महापालिकेबाहेरून लढा सुरू ठेवला होता. आता त्यांनी थेट महापालिकेच्या निवडणुकीत उतरुन पारदर्शी कारभार आणि विकासाबरोबरच समाजकारणरूपी राजकारणाचे शुद्धिकरण करू, असा दावा केला आहे. त्यादृष्टीनेही अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यासह टीमने तयारी सुरू केली आहे. सर्वपक्षीय कृती समितीनेही स्थानिक प्रश्‍नांवर लढा उभारला आहे. त्यामध्ये सर्वच पक्षातील दुसर्‍या फळीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. यामध्ये  सध्या महापालिकेतील स्वाभिमानी विकास आघाडीही सहभागी आहे. साहजिकच ही आघाडीसुद्धा मैदनात असेल. पण चार सदस्यीय प्रभाग हे पक्षांसह आघाड्यांनाही मोठे आव्हान आहे. त्यामुळे  या सर्वांच्या भूमिकाही सत्तेपासून मतांच्या जमा-वजाबाकीत महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यादृष्टीने त्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणाशी हातमिळवणी होणार, कोण कोण रसद पुरविणार यावरही सत्तेचा सारिपाट ठरणार आहे.