Sat, Jul 04, 2020 04:52होमपेज › Sangli › सांगलीची जागा स्‍वाभिमानीला द्‍या, असे आम्‍ही म्‍हटले नाही : जयंत पाटील

सांगलीची जागा स्‍वाभिमानीला द्‍या, असे आम्‍ही म्‍हटले नाही : जयंत पाटील

Published On: Mar 27 2019 7:18PM | Last Updated: Mar 27 2019 7:21PM
इस्लामपूर : प्रतिनिधी  

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या दोन जागा द्यायचे ठरले होते. आम्ही आमच्या वाट्याची हातकणंगलेची जागा त्यांना दिली आहे. आता काँग्रेसने त्यांना कोणती जागा द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. आमुकच जागा स्वाभिमानीला द्या, असे आम्ही काँग्रेसला सांगितलेले नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी असे सांगून सांगलीच्या प्रश्नावर जास्त बोलने टाळले. 

खासदार शेट्टी यांच्या प्रचार सभेत येडेमच्छिंद्र येथे जयंत पाटील बोलत होत‍े. माजी खा. प्रतीक पाटील. आ. विश्वजित कदम. आदी यावेळी उपस्थित होते. सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमानीला हा सध्या चर्चेचा विषय आहे. याच पाश्र्वभूमीवर आज खा. शेट्टी यांची प्रचार सभा झाली. या सभेत जयंत पाटील यांनी सांगलीच्या प्रश्नावर जास्त बोलणे टाळले. आम्ही त्यांना जागा दिली आहे. काँग्रेसने त्यांच्या वाट्याची कोणती जागा द्यायची हे त्यांनी ठरवावे. सांगलीच द्या, असे आम्ही सांगितलेले नाही.

प्रतीक पाटील म्हणाले, आता माझा कोणताच पक्ष राहिलेला नाही. वसंतदादांचा विचार हाच माझा पक्ष असेल. उगाच गैरसमज नको म्हणून मी इथे आलो आहे. दादा - बापू गटातील संघर्ष थांबविण्यासाठी जयंतराव आपण एकत्र येवूया. हा संघर्ष तुम्हालाच विधानसभेला अडचणीचा ठरणार आहे. यावेळी विश्वजीत कदम म्हणाले, प्रतीक पाटील यांनी भावनाविवश होऊन घेतलेला निर्णय मागे घ्यावा. काँग्रेस पक्षाचेच क‍ाम करावे, अशी म‍ाझी इच्छा आहे.