Tue, Jul 14, 2020 01:21होमपेज › Sangli › भीषण अपघातात सहा पैलवान ठार

भीषण अपघातात सहा पैलवान ठार

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 13 2018 11:07PM

बुकमार्क करा
देवराष्ट्रे/कडेगाव : प्रतिनिधी

कडेगाव तालुक्यातील वांगी आणि शिरगाव सीमेवर झालेल्या क्रूझर व टॅ्रक्टर यांच्या भीषण अपघातात 6 पैलवान जागीच ठार झाले; तर आठजण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये व जखमींमध्ये कुंडलच्या क्रांती कुस्ती केंद्र व कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीतील पैलवानांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

पै.  शुभम अंकुश घार्गे (वय  23, रा. सोहोली, ता. कडेगाव), पै. सौरभ अनिल माने (20, रा. मालखेड, ता. कराड), पै. आकाश दादासो देसाई (23, रा. काले, ता. कराड), पै. अविनाश सर्जेराव गायकवाड (21, रा. फुफिरे, ता. शिराळा), पै. विजय शिवाजी शिंदे (24, रा. रामापूर, ता. कडेगाव) तसेच क्रूझरचा चालक रणजित दिनकर धनवडे (20, रा. दुधोंडी, ता. पलूस) अशी मृतांची नावे आहेत. तर तुषार धनाजी निकम (21, रा. शेणे, ता.कराड), सुदर्शन सुरेश जाधव (19, रा. येणपे, ता. कराड), अनिकेत अशोक जाधव (20, रा. किवळ, ता. कराड), अजय प्रकाश कासुर्डे (21, रा. निगडी, ता. शिराळा),

अनिकेत कृष्णा गावडे (22, रा. दुधोंडी, ता. पलूस), प्रतीक निकम (रा. चोराडे, ता. खटाव), अनिल पाटील (रा. काले, ता. कराड), रितेश चोपडे (रा. साळशिरंबे, ता. कराड) हे जखमी झाले. शुक्रवारी औंध (जि. सातारा) येथील मैदानासाठी क्रांती कुस्ती संकुलातील प्रशिक्षक सुनील मोहिते यांच्याबरोबर हे सर्व पैलवान गेले होते. येथील मैदान संपल्यानंतर सर्वजण क्रूझरमधून (एम.एच 10- एएन 7385) परत येत होते. प्रशिक्षक सुनील मोहिते सोहोलीत थांबले. त्यांना सोडल्यानंतर सर्व पैलवान पुढे कुंडलकडे निघाले होते.

सातारा-सांगली राज्यमार्गावरून जात असताना वांगीपासून पुढे आल्यानंतर शिरगाव फाट्याजवळ कुंडलहून  येणार्‍या ट्रॅक्टरने (एमएच 23 डी 8914) क्रूझरला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझरमधील सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील क्रूझर गाडीचा चक्‍काचूर झाला. घटनास्थळावर रक्‍ताचे सडे व मांसाचा खच पडला होता. या अपघातातनंतर परिसरात मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील लोकांनी घटनास्थळावर धाव घेतली व क्रूझरमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढले. 

या दुर्देवी घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यु झाला. तर आठ जखमींना तातडीने पलूस तसेच मिरजेतील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही धडक इतकी जोरदार होती की रात्रीच्या वेळेस मृतांमध्ये कोणाचा समावेश आहे हे ओळखणे कठीण झाले होते. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी प्रवाशांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. 

या घटनेबाबत पै. सुदर्शन सुरेश जाधव (रा.येनपे ता. कराड) याने फिर्याद दिली असून चिंचणी-वांगी पोलिसांत ट्रॅक्टर चालक  दिनकर राजाराम पवार (रा. राजापूर, ता. तासगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींपैकी काही युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आ. मोहनराव कदम यांची घटनास्थळी भेट
शुक्रवारी रात्री झालेल्या जीप व ट्रॅक्टरच्या अपघातात सहा तरुण पैलवानांचा मृत्यू झाला.यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळी आ.मोहनराव कदम यांनी भेट देवून अपघाताची माहिती घेतली आणि संबधित अधिकार्‍यांना मदतीविषयी सूचना केल्या.

पैलवान कुटुंबावर आघात
शुक्रवारी  रात्री जीप व ट्रॅक्टरच्या अपघातात सोहोली येथील शुभम घार्गे व रामापूर येथील विजय शिंदे या तरुण पैलवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी सोहोली व रामापूर गावात समजताच दोन्ही गावांवर शोककळा पसरली.पै. शुभम घार्गे हा पैलवान कुटुंबातला होता. त्याचा मृतदेह घरी आणताच संपूर्ण कुटुंबाने हंबरडा फोडला हे पाहून संपूर्ण गाव शोकाकुल 
झाले.