होमपेज › Sangli › द्राक्षबागायतदारांची कोट्यवधींची लुबाडणूक 

द्राक्षबागायतदारांची कोट्यवधींची लुबाडणूक 

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 1:27AMतासगाव : दिलीप जाधव 

उन्हाळा सुरू झाल्याने द्राक्षे लवकर विकली जावीत, यासाठी व्यापार्‍यांच्या पाठीमागे लागण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. याचा फायदा घेऊन द्राक्ष बागायतदारांना लूटण्याचा उद्योग व्यापार्‍यांनी सुरू केला आहे. 

एकसारखी द्राक्षे नसल्याचे सांगून तसेच सुमार दर्जाची द्राक्षे घेण्याचे आमिष दाखवून प्रति 20 किलो पाठीमागे एक किलो सूट घेतली जात आहे. सुटीच्या नावाखाली एका टनाच्या पाठीमागे 50 किलो द्राक्षांवर डल्ला मारला जात आहे. 

चांगल्या मालाबरोबर सुमार दर्जाची द्राक्षे घेऊन जायची असल्यास 20 किलो पाठीमागे एक किलो सूट द्यावी लागेल, अशी अट व्यापारी शेतकर्‍यांना घालत आहेत. एक एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेत सरासरी 12 टन द्राक्षे निघतात. सूट दिल्यामुळे सुमारे 600 किलो द्राक्षे फुकटच जातात. यामुळे शेतकर्‍याचे एकरी सरासरी 25 ते 30 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान होते.