Mon, Jun 17, 2019 10:21होमपेज › Sangli › ‘एफआरपी’साठी शेतकर्‍यांचा उद्रेक

‘एफआरपी’साठी शेतकर्‍यांचा उद्रेक

Published On: Jan 13 2019 1:39AM | Last Updated: Jan 13 2019 1:39AM
सांगली / बोरगाव : वार्ताहर 

एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  छेडलेल्या आंदोलनास जिल्ह्यात शनिवारी हिंसक वळण लागले. रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे ‘स्वाभिमानी’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे तसेच घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे गट कार्यालय पेटविले. जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक कारखान्यांच्या कार्यालयांना शेतकर्‍यांनी टाळे ठोकले. 

साखर कारखान्यांनी एफआरपी एकरकमीच द्यावी, या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी 2300 रुपयांची पहिली उचल जाहीर केली; परंतु सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य कारखानदार मात्र अद्याप शांत आहेत. काहींनी 2300 रुपयांनी बिले दिली आहेत. यामुळे शेतकर्‍यांत संतापाची लाट उसळली आहे.  

आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी  रेठरेहरणाक्ष येथे आंदोलकांनी कृष्णा  कारखान्याचे गट कार्यालय पेटवून दिले. येथे कृष्णा कारखान्याची मालकीची इमारत आहे. तळमजल्यावर खत आणि साखर वाटप विभाग, तर दुसर्‍या मजल्यावर गट कार्यालय आहे. 

शनिवारी पहाटे अज्ञातांनी कार्यालयाच्या पहिल्या मजल्याच्या दाराचे  कुलूप तोडून दुसर्‍या मजल्यावर प्रवेश केला. गट कार्यालयाच्या दाराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञातांनी कार्यालयात प्रवेश केला.  कार्यालयातील टेबल-खुर्च्या एकत्र केल्या. कार्यालयातील कागदपत्रे टेबलावर ठेवण्यात आली. रॉकेल ओतून ते पेटवून देण्यात आले. 

पहाटे दुसर्‍या मजल्यावरून उठणारे धुराचे लोट नागरिकांच्या नजरेस आले. नागरिक कार्यालयाच्या दिशेेने धावले. त्यांनी आग विझविली. नागरिकांनी आगीची माहिती कर्मचार्‍यांना दिली. त्यानंतर शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, संचालक सुजित मोरे, गट अधिकारी विकास कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. गटाधिकारी विकास कदम यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली. 

 क्रांती कारखान्याचे घोगाव (ता. पलूस) येथील गटकार्यालयही पेटवून दिले. ऊस पट्ट्यातील अनेक प्रमुख गावांत कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. यामध्ये मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दत्त इंडिया, मोहनराव शिंदे, शिवशक्ती, कागवाड या कारखान्यांच्या कार्यालयास  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत कारखानदारांचा निषेध केला. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. दोन्ही घटनास्थळी  संबधित कारखाना पदाधिकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली.