Mon, Dec 16, 2019 10:53होमपेज › Sangli › वाळू तस्करांचा मोर्चा मुरूम, मातीकडे

वाळू तस्करांचा मोर्चा मुरूम, मातीकडे

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 7:54PMइस्लामपूर : मारूती पाटील

वाळवा तालुक्यात वाळू उपसा बंद झाल्याने वाळू तस्करांनी आता आपला मोर्चा मुरूम व माती उत्खननाकडे वळविला आहे. कृष्णा नदीकाठावर अवैधरित्या राजरोसपणे माती उत्खनन सुरू असल्याने नदीकाठच्या जमिनी खचू लागल्या आहेत. महसूल विभागाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. 

वर्षभरापासून वाळू उपशावर बंदी आल्याने तालुक्यातील वाळू ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या व्यवसायातून अनेकजण कोट्यधीश बनले आहेत. वाळू उपशावर बंदी आल्याने या व्यवसायात गुंतलेले अनेकजण आर्थिक कोेंडीत सापडले आहेत. या व्यवसायात गुंतविलेला पैसा मिळविण्यासाठी आता काही वाळू ठेकेदारांनी मुरूम व माती उत्खननाकडे आपला मोर्चा वळविला आहे. मुरूम उत्खननाला बंदी असतानाही तालुक्यातील अनेक गावात राजरोसपणे मुरूम उत्खनन सुरू आहे. काही ब्रासची नाममात्र रॉयल्टी भरून अनेक पटीने मुरूमाची चोरी केली जात आहे. वन विभाग व सरकारी हद्दीतीलही मुरूमाची चोरी सुरू आहे. महसूल विभागाने अनेकवेळा ही चोरीची वाहने पकडली आहेत. मात्र त्या वाहनांच्यावर काय कारवाई केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

मुरूमाबरोबरच नदीकाठच्या मातीचीही चोरी सुरू आहे. कृष्णा नदीकाठावरील हुबालवाडी, खरातवाडी, मसुचीवाडी, नरसिंहपूर, गौंडवाडी, नवेखेड आदी ठिकाणी वीट भट्ट्यांच्या नावाखाली माती उत्खनन करून त्याची जास्त दराने विक्री सुरू आहे. अनेकांनी आता माती उत्खननाचाच धंदा सुरू केला आहे.त्यामुळे नदीकाठावरील जमिनींनाही धोका निर्माण होऊन जमिनी खचू लागल्या आहेत. या सर्व चोरीकडे महसूल विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.