Wed, Jul 15, 2020 16:04होमपेज › Sangli › ऐक्य सद्भावना रॅलीतून दाखवू

ऐक्य सद्भावना रॅलीतून दाखवू

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 13 2018 9:30PM

बुकमार्क करा
सांगलीः प्रतिनिधी

भीमा-कोरेगावच्या निमित्ताने महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे. परंतु हे सावट दूर करून सांगलीकरांचे ऐक्य राज्याला उद्या (रविवार) होणार्‍या सद्भावना एकता रॅलीतून दाखवून देऊ, असा निर्धार नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केला. 

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील व आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी महापालिकेत तयारीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती बसवेश्‍वर सातपुते, उपमहापौर विजय घाडगे, उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, नगरसेवक राजेश नाईक, युवराज गायकवाड, विष्णू माने आदींनी रॅलीत पाणी, खाऊसह विविध जबाबदार्‍या उचलल्या. 

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, राजकारण, समाजकारण आणि सामाजिक ऐक्याची उज्ज्वल परंपरा असलेला सांगली शहर व जिल्हा आहे. देशाला आदर्श घालून देणार्‍या सांगली जिल्हा आणि शहरात नुकत्याच बाहेर घडलेल्या संशयास्पद घटनांचे पडसाद वातावरण कलुषित करीत आहेत. यावेळी सर्वांनी ऐक्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हे वातावरण या सद्भावना रॅलीने निवळेल. याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यात सर्वस्वी सहभाग असावा.

खेबुडकर म्हणाले, महापालिकेच्या पदाधिकारी, नगरसेवक, अधिकार्‍यांनी यात मोठा सहभाग घेतला आहे. जबाबदारीही स्वयंस्फूर्तीने स्वीकारली आहे. महापौर शिकलगार म्हणाले, सांगलीच्या ऐक्यात असले प्रकार कधीच विघ्न आणू शकत नाहीत. सांगलीचा एकोपा अधिक घट्टच करतात. त्यादृष्टीने उद्याची सद्भावना रॅली आदर्श असेल. यावेळी किशोर जामदार यांनी स्टेज, साऊंडसिस्टिमची जबाबदारी घेतली. शेखर माने यांनी संपूर्ण रॅलीला पाणी, युवराज गायकवाड यांनी रॅलीत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना बिस्किटांसह खाऊची जबाबदारी घेतली. उद्योजक मयूरशेठ पाटील यांनी फलकांची जबाबदारी घेतली. बसवेश्‍वर सातपुते, राजेश नाईक आदींनी रॅलीत टोप्या पुरवठ्याची जबाबदारी उचलली. यावेळी सर्व नगरसेवक, पदाधिकारी  उपस्थित होते. 

ही तर आमची जबाबदारी होती...!
शेखर माने म्हणाले, महापालिका क्षेत्रात कलुषित वातावरण होऊच न देणे आणि झाल्यानंतर त्यावर फुंकर घालण्यासाठी जे काही करायचे होते. ती सर्व जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून आमची होती. सद्भावना मोर्चासाठीही आम्हीच आघाडी सांभाळायला हवी होती. परंतु जिल्हाधिकारी पाटील, आयुक्‍त खेबुडकर यांच्यासह प्रशासनाने ही जबाबदारी उचलली आहे. याबाबत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.