Fri, Jul 10, 2020 19:45होमपेज › Sangli › ब्लॉग :आबांच्या जाण्याने ‘स्वर्ग श्रीमंत तर पृथ्वी गरीब झाली’ 

ब्लॉग :आबांच्या जाण्याने ‘स्वर्ग श्रीमंत तर पृथ्वी गरीब झाली’ 

Published On: Feb 16 2018 11:57AM | Last Updated: Feb 16 2018 11:57AMविलास साळुंखे

अंजनीसारख्या ग्रामीण भागात  शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आर. आर. आबांनी राज्यातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले. आपल्या मतदारसंघाला लागलेला दुष्काळाचा कलंक कायमचा पुसण्यासाठी अहोरात्र कष्ट केले. 35 वर्षाचे राजकीय जीवन कष्टकरी, गरीब, शेतकरी, शोषित यांच्यासाठीच समर्पित केले. आबांची 16 फेब्रुवारी   रोजी तिसरी पुण्यतिथी. त्यानिमित्त..!  

आबांनी तालुक्याचाच नव्हे तर जिल्ह्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला. घरची परिस्थिती बेताची होती. आबांचे  सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अंजनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, माध्यमिक शिक्षण सावळज येथे महात्मा गांधी विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण शांतिनिकेतन येथे तर सांगलीत वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. 

आबा सावळज जिल्हा परिषद गटातून पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले. जिल्हा परिषदेत बाहेरील बाकड्यावर बसून सामान्यांची  कामे करताना आबांना अनेकांनी  पाहिले होते. आबांच्या कार्याला खरी झळाली मिळाली ती जिल्हा परिषदेच्या सभागृहात. सभागृहात   सामान्यांचे प्रश्न मांडताना आबांनी आपल्या राजकारणाची उंची गाठली.

आबांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकासमंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, गडचिरोलीचे पालकमंत्री अशी अनेक पदे भूषवली. ग्रामस्वच्छता, तंटामुक्त गाव ही अभियाने राबविली. सावकारी विरोधात, डान्सबार बंदीचा कायदा केला. आरफळ, ताकारी, म्हैसाळ, विसापूर - पुणदी या योजना राबवून मतदारसंघातील दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत विरोधी बाकावर बसून त्यांनी युती सरकारला ‘सळो की पळो’ करुन सोडले. आपल्या कामांसाठी अंजनी येथे भेटायला येणार्यांची संख्या प्रचंड असायची. आबांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र एका अभ्यासू नेतृत्वाला मुकला आहे. आबांच्या जाण्याने  ‘स्वर्ग श्रीमंत झाला पण पृथ्वी मात्र गरीब झाली’ आहे.