Mon, Jul 13, 2020 06:29होमपेज › Sangli › माडग्याळमध्ये हॉटेल-बिअरबारवर दरोडा

माडग्याळमध्ये हॉटेल-बिअरबारवर दरोडा

Published On: Dec 12 2018 1:55AM | Last Updated: Dec 12 2018 12:27AM
माडग्याळ  :  वार्ताहर      

माडग्याळ (ता जत) येथे  हॉटेल युवराज बिअरबारवर सोमवारी  मध्यरात्री दरोडा घालण्यात आला. हॉटेलमधील कामगार आणि मालक यांना मारहाण करून आणि तलवारीचा धाक दाखवून गोदामातील तीन लाख रुपयांची विदेशी दारू त्यांनी लंपास केली.   दरोडेखोर सात होते. हॉटेलचे शटर उचकटून ते आत शिरले. हॉटेलचे मालक बापू नानासाहेब सावंत (वय 55) व कामगार संपत बोरकडे  यांना दरोडेखोरांनी मारहाण   केली.तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. सात  अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध  सावंत यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद  दिली आहे. दरम्यान पोलिसांनी दत्ता रामू चव्हाण व दिगंबर रामू चव्हाण या दोन संशयितांना पकडले आहे .

सांगलीच्या एलसीबी पथकाने  दरोडेखोरांचा पाठलाग केला. त्यावेळी  या  पथकावर दरोडेखोरांनी क्लूझर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोर पळून जाताना त्यांची क्लूझर गाडी ( एम. एच. - 10 ए एन 2956) ही कोळगिरी येथे पलटी होऊन अपघात झाला.त्यावेळी दोन संशयितांना पकडण्यात आले.  तीन लाखांचा माल जप्त करण्यात आला. सांगली एलसीबी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी ही कारवाई केली .

गावात बसस्थानकालगतच उमदी रस्त्यावरहॉटेल युवराज बिअरबार आहे.  रात्री दहा वाजता  बिअरबार बंद करून मालक  सावंत व कामगार संपत बोरकडे हे झोपले होते. रात्री दोन वाजता  शटर खोलून दरोडेखोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यांच्या हातात तलवार व लोखंडी रॉड अशी हत्यारे होती.एका दरोडेखोराने  सावंत व बोरकडे यांना  मारहाण सुरू केली. दोघांकडील मोबाईल काढून घेण्यात आले.आरडाओरड करताना सावंत आणि बोरकडे यांना तलवारीचा धाक दाखवून ‘ कुणी आवाज केला तर जिवंत ठेवणार नाही’ असा दम दरोडेखोरांनी  दिला.दरोडेखोरांनी  दोघांना धमकी देत पैशांची मागणी केली. एकाने कॅश काऊंटरचे लॉक तोडून आतील 18 हजार  रुपये काढून घेतले.  काही दरोडेखोर गोदामाकडे गेले. त्याचे  कुलूप तोडण्यात आले . विविध कंपन्यांचे विदेशी दारूचे बॉक्स त्यांनी पळवून नेले.दरोडेखोरांनी हॉटेल मालक व कामगाराला दम दिला. ‘तुम्ही बाहेर आला तर आम्ही बाहेर आहोत.तुम्हास आम्ही मारून टाकू’ अशी धमकी दिली. दरोडेखोरांनी क्लूझर  गाडी उमदी रस्त्यालगत एका शेतात थांबवली होती. विदेशी दारूचे सर्व बॉक्स दरोडेखोरांनी गाडीत नेऊन ठेवले.त्यानंतर ते गाडी सुरू करून जात असताना सांगलीचे एलसीबी पथक गस्त घालत तिथे आले. त्यांना दरोडेखोर क्लूझर गाडीतून पळून जाताना दिसले.  त्यावेळी गाडी थांबवण्याचा प्रयत्न एलसीबी पथकाने केला.पण दरोडेखोर गाडी जोरदार वेगाने चालवू लागले.त्यावेळी एलसीबी पथक माडग्याळ गावातून पाठलाग करू लागले.

ग्रामीण रुग्णालयाजवळ एलसीबीचे पथक आणि दरोडेखोरांची झटापट झाली. नंतर दरोडेखोरांनी  व्हसपेठमार्गे गाडी पळवली. एलसीबी पथकाच्या गाडीवर ते दारूच्या बाटल्या फेकू लागले. हा पाठलाग कोळगिरीपर्यत सुमारे 10 किलोमीटर सुरू होता. कोळगिरीत मात्र  दरोडेखोरांची गाडी पलटी झाली. पोलिसांनी  दत्ता रामू चव्हाण व दिगंबर रामू चव्हाण यांना पकडले. अन्य पाच दरोडेखोर पळून गेले. उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. कोल्हापूर येथून ठसे तज्ज्ञांचे पथक आले होते.दुपारी सांगलीतून श्‍वानपथक येऊन  आले  होते.