होमपेज › Sangli › सांगलीः बाजारात भाव नाही; शेतकऱ्याने कोबी, फ्लॉवरवर फिरवला ट्रॅक्टर

सांगलीः बाजारात भाव नाही; शेतकऱ्याने कोबी, फ्लॉवरवर फिरवला ट्रॅक्टर

Published On: Apr 10 2018 8:43PM | Last Updated: Apr 10 2018 9:07PMमांजर्डे : वार्ताहर

कोबी व फ्लॉवर या भाज्यांना बाजारात भाव मिळत नसल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्याने कोबी आणि फ्लॉवरच्या शेतीत ट्रॅक्टर फिरवला. ही घटना मांजर्डे (ता. तासगाव जि. सांगली) येथे घडली. 

येथील शेतकरी रविंद्र रामचंद्र मोहिते (वय 50) यांनी आपल्या एक एकर शेतीत कोबी आणि फ्लॉवरची लागवड केली होती. मात्र सध्या बाजारात या भाज्यांना भाव मिळत नसल्याने शेती तोट्यात चालल्याने ते नाराज होते. शेवटी त्यांनी वैतागून कोबी आणि फ्लॉवरवरच्या शेतीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरवला. बाजारात भाव नसल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयाचं नुकसान झाले आहे.

रविंद्र मोहिते यांनी आपल्या शेतात 1 एकर क्षेत्रावर कोबी व फ्लॉवरची लागण केली होती. पाणीटंचाई असताना शेतातील कुपनलिकेला असलेल्या पाण्यावर लागण केली होती. त्यासाठी विकत बियाणे आणले होते, वेळेवर औषध फवारणी करून शेती योग्यरितीने फुलवली. त्यासाठी 80 हजार ते एक लाख रुपये खर्च करण्यात आला होता. एवढा खर्च करून सुद्धा सध्या बाजारात या भाज्यांना भाव मिळत नव्हता. खाण्या योग्य झालेल्या कोबी व फ्लॉवरला बाजारात प्रति किलो 2 रुपये प्रमाणे भाव मिळत होता.

त्यामुळे त्याची काढणी ही परवडणारी नाही. यासाठी घातलेला खर्च सुद्धा मिळणार नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कोबी शेतीवर टॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरवून ती उधवस्त करून टाकली. पाणी नसताना पाणी पट्टी भरून सांभाळलेल्या शेतात पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळाला नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

एक लाख रुपये नफा अपेक्षित असताना झाला तोटा

कोबी व फ्लॉवरच्या शेतीतून शेतकऱ्यास एक लाख रुपये नफा अपेक्षित होता. परंतू, नफा राहिला बाजूला साधा उत्पादन खर्च सुद्धा यामधून निघाला नाही. नफा मिळण्याऐवजी 1 लाख रुपये अंगावर बोजा पडला.

एक कोबीचा गड्डा पडला एक लाख रुपये

यावेळी बोलताना मोहिते म्हणाले, अजून कोबी व फ्लॉवर यामधून एक रुपया सुद्धा नफा मिळाला नाही. आतापर्यंत यावर 1 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातील एकच गड्डा घरी आणून खाल्ला होता. त्यामुळे तो एक कोबीचा गड्डा आम्हाला एक लाख रुपयाला पडला.

Tags : rate down, market, farmer, tractor, Cabbage, flower, farm, sangali news