Fri, Jul 10, 2020 19:33होमपेज › Sangli › सांगलीत हॉटेल नवरत्नवर छापा

सांगलीत हॉटेल नवरत्नवर छापा

Published On: Oct 27 2018 1:47AM | Last Updated: Oct 26 2018 11:42PMसांगली : प्रतिनिधी

येथील नवरत्न हॉटेलमध्ये ग्राहकाला दिलेल्या उपिटात चक्क झुरळ आढळून आले. याप्रकरणी ग्राहकाच्या तक्रारीनुसार अन्न-औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांच्यासह पथकाने छापा टाकला. पथकाने हॉटेलच्या स्वयंपाकघराची तपासणी केली. तिथे सर्वत्र झुरळ व जळमटे आढळून आल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, झुरळ असलेले उपीट तसेच घाणीच्या साम्राज्यात केलेल्या खाद्यपदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. याप्रकरणी संबंधित हॉटेलला पुढील आदेश होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. चौगुले म्हणाले, हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी नीलेश चौगुले हे वडिलांसमवेत नाष्टा करण्यासाठी गेले होते. त्यांनी उपीट घेतले. त्या प्लेटमध्ये झुरळ आढळून आले. याचदरम्यान सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांच्यासह कार्यकर्तेही तेथे जमले. या सर्वांनी अन्न-औषध प्रशासनाला कळविले. 

ते म्हणाले, ही माहिती मिळताच वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, अधिकारी आर. एल. महाजन, सौ. स्मिता हिरेमठ, सहाय्यक तानाजी कवळे, चंद्रकांत साबळे आदिंनी छापा टाकून तपासणी केली. त्यावेळी उपीटाच्या प्लेटमध्ये झुरळ आढळून आले. पथकाने स्वयंपाकगृहाचीही झाडाझडती घेतली. तेथे साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.झुरळे फिरत असल्याचे आढळून आले. अनेक ठिकाणी जळमटे होती. चौगुले यांनी सांगितले, की पथकाने तेथील घाणीचे छायाचित्र, चित्रीकरण करून सर्व खाद्यपदार्थांचे नमुने घेतले आहेत. ते तपासणीला पाठविले आहेत. 

अनेक हॉटेलमध्ये घाण; कडक तपासणीची गरज

ग्राहकाच्या तक्रारीनुसार अन्न-औषध प्रशासनाने या हॉटेलमध्ये तपासणी केली. त्यामुळे स्वयंपाकगृहातील घाणीचे साम्राज्य चव्हाट्यावर आले. शहरातील लहान-मोठ्या हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या ठिकाणी यापेक्षाही अधिक भयावह स्थिती आहे. त्यातून नागरिकांना खाद्यातून विषबाधा होण्याचा धोका आहे. परंतु त्यांची तपासणी होत नाही. नागरिकही पाठीमागे काय चालते न पाहता पदार्थांवर चवीने ताव मारतात. यातून विषबाधा होण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्व हॉटेल्सची  कडक तपासणी  करण्याची गरज आहे.