मिरज : शहर प्रतिनिधी
वादग्रस्त ठरलेल्या अमृत जल योजनेच्या मिरजेतील ठेकेदारांच्या मिरज व स्वस्तिक कन्स्ट्रक्शनच्या कोल्हापूरमधील कार्यालयावर केंद्रीय जीएसटी विभागाच्या सांगली व कोल्हापूरच्या पथकाने छापे टाकले. जाधव एस. व्ही. पार्टनरशिप फर्म आणि जाधव एस. व्ही. जॉईंट व्हेंचर या ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात केंद्रीय जीएसटी चुकविल्याचा अधिकार्यांना संशय आहे. या छाप्यात अधिकार्यांनी संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत.
राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मिरजेसाठी अमृत ही पाणीपुरवठा करणारी सुमारे शंभर कोटींची योजना मंजूर झाली. ती मंजूर झाल्यापासून वादाच्या भोवर्यात सापडली आहे. या योजनेच्या बाबतीत नगरसेवक व अधिकार्यांमध्ये वादही सुरू आहेत. मिरजेसाठी असलेल्या या योजनेचा ठेकेदारही मिरजेचा आहे. जाधव एस. व्ही. पार्टनरशिप फर्म, जाधव एस. व्ही. जॉईंट व्हेंचर आणि स्वस्तिक कन्स्ट्रक्शन (कोल्हापूर) या तीन ठेकेदारांच्या नावाने ही योजना मंजूर आहे.
या योजनेचे काम सध्या मिरजेत सुरू आहे. ठेकेदाराला काही बिलेही महापालिकेच्या माध्यमातून अदा करण्यात आली आहेत. केंद्रीय जीएसटी विभागाकडून सध्या करचुकवेगीरीचा शोध घेतला जात आहे. सांगली जिल्ह्यातील अनेकजण जीएसटी चुकवल्याच्या संशयावरून भोवर्यात सापडले आहेत. मिरजेतील केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडून याबाबत चौकशी सुरू आहे. काहींना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. अमृत योजनेच्या ठेकेदारांकडून जीएसटी चुकवल्याचा अधिकार्यांना संशय आल्याने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे तपासली. त्यातही त्यांना संशय आल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकार्यांच्या एका संयुक्त पथकाने या ठेकेदाराच्या मिरज येथील दोन आणि कोल्हापुरातील एका कार्यालयावर छापे टाकले. या छाप्यात ठेकेदाराच्या कार्यालयातून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्या कागदपत्रांची या कार्यालयांमध्ये सध्या छाननी सुरू आहे. संबंधित ठेकेदारांकडे चौकशी सुरू आहे. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
कोल्हापुरातूनही कागदपत्रे जप्त...
मिरजेच्या अमृत योजनेचा कोल्हापुरातील स्वस्तिक कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे हा ठेका आहे. त्या कंपनीच्या कार्यालयावरही जीएसटीच्या पथकाने छापा टाकून कागदपत्रे जप्त केली आहेत.