होमपेज › Sangli › मतदारसंघातील राजकारण नव्या  वळणावर

मतदारसंघातील राजकारण नव्या  वळणावर

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 07 2018 9:22PMकडेगाव : रजाअली पिरजादे 

पलूस-कडेगाव मतदार संघात आता सुबत्ता आली आहे. त्यामुळे  येथील राजकारण वेगळ्या वळणावर जात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.(स्व.)यशवंतराव चव्हाण आणि   (स्व.) वसंतदादा पाटील यांनी जिल्ह्याचे राजकारण केले. जिल्ह्याचे राजकारण करतानाच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर सांगलीची पकड ठेवली. दादा सांगतील ते महाराष्ट्रात घडत असे.दादांच्या नंतर (स्व.)डॉ.पतंगराव कदम, (स्व.)आर.आर.पाटील यांनी नेतृत्व केले. आता नेतृत्वाची धुरा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहे.

डॉ.पतंगराव कदम यांनी स्वकर्तृत्वावर जिल्ह्याचा आणि मतदार संघाचा विकास करून जिल्ह्यात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.जिल्ह्यात  पलूस-कडेगाव मतदार संघाला एक वेगळे महत्व आहे.या मतदार संघावर डॉ. कदम यांनी विकासकामांच्या माध्यमातून आपले वर्चस्व कायम राखले.कडेगाव आणि पलूस असे दोन तालुके मिळून हा मतदार संघ बनला आहे. कडेगाव हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. परंतु टेंभू आणि ताकारी या सिंचन योजनामुळे  या तालुक्याचा कायापालट झाला असल्याचे दिसते.पलूस तालुका  कारखानदारीमुळे आणि कृष्णा काठामुळे सधन तालुका म्हणून ओळखला जातो.

आज या दोन्ही तालुक्यांचे अर्थकारण पूर्णपणे बदलले असल्याचे दिसते.याला कारण येथे आलेली सुबत्ता. दोन तालुक्यांचा डॉ.कदम यांच्या नेतृत्वामुळे मोठा विकास झाल्याचे दिसून येते. पूर्वी राजकारणात पलूस तालुका आघाडीवर होता. क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड , बाजीरावआप्पा पाटील , माजी आमदार संपतराव चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते तालुक्याला लाभले. या नेत्यांचा नेहमीच संपर्क (स्व.) वसंतदादा पाटील यांच्याबरोबर राहिला.साहजिकच त्यामुळे या तालुक्याला राजकारणात नेहमीच झुकते माप मिळाले. पलूस तालुका झाल्याने अनेक सुविधाही मिळाल्या. 

कडेगाव तालुक्यात माजी मंत्री डॉ.कदम , माजी आमदार ( स्व.)संपतराव देशमुख ,आमदार मोहनराव कदम यांच्यामुळे तालुक्याला राजकारणात अधिक महत्व आले.विशेषतः डॉ. कदम  एस. टी. महामंडळाचे संचालक झाल्यानंतर या तालुक्याला वेगळे महत्व प्राप्त झाले. क्रमाक्रमाने  कडेगाव तालुक्याने विकासात आघाडी घेतली.सिंचन योजना सुरू झाल्याने लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. उद्योग आणि व्यवसाय वाढले.दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला.साहजिक तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलला. तालुका झाल्याने येथे अनेक सुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे येथील अर्थकारणही बदलले.

कडेगाव-पलूस मतदार संघाचा प्रगतीचा आलेख उंचावत असतानाच अशा परिस्थितीत डॉ. कदम यांचे  निधन झाले.त्याचा मोठा फटका विकासाला बसला आहे.आज प्रत्येक विकासकामाच्या वेळी डॉ.कदम यांची उणीव लोकांना भासू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे.केंद्र आणि राज्यातील राजकारणातील बदलाचा परिणामही या मतदार संघावर झाल्याचे दिसते.सुबत्ता आल्याने दोन्ही तालुक्यातील लोकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. त्याचे परिणामही बदलत्या राजकारणात दिसू लागले आहेत. 

आता युवा पिढीकडे नेतृत्व

(स्व.)डॉ.कदम यांनी तीस वर्षे आपले नेतृत्व अबाधित ठेवले.आता राजकारणाचे वातावरण पुन्हा वेगळ्या वळणावर गेले आहे. युवकांची पिढी आता सत्तेत येऊ पाहत आहेत.  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  डॉ.विश्वजित कदम आमदार म्हणून काम करू लागले आहेत.   जिल्हापरिषदेचे अध्यक्ष म्हणून संग्रामसिंह देशमुख काम करीत आहेत.