Fri, Jul 10, 2020 17:26होमपेज › Sangli › डॉ. पतंगराव कदम-संजय पाटील एकसाथ

डॉ. पतंगराव कदम-संजय पाटील एकसाथ

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:51PM

बुकमार्क करा
सांगली : उध्दव पाटील

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीत सत्ताधारी डॉ. कदम गटाने पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबले. काँग्रेसचे नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे खासदार संजय पाटील ‘एकसाथ’ असल्याचे दिसून आले. माजी मंत्री अजितराव घोरपडे व काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांना सत्तेबाहेरच रहावे लागले आहे. मदनभाऊ गटाचे संचालक दिनकर पाटील हे सभापती झाले. मात्र पाटील यांचे डॉ. कदम यांच्याशी पूर्वीपासून असलेले सख्यच अधिक उपयोगी पडले. वसंतराव गायकवाड यांना संधी न मिळाल्याने मदनभाऊ गटात ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती होती. 

सांगली बाजार समितीच्या ऑगस्ट 2015 च्या निवडणूक निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. माजी मंत्री जयंत पाटील, मदन पाटील, खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार सुमनताई पाटील, विजय सगरे या तगड्या टीम विरोधात डॉ. पतंगराव कदम, अजितराव घोरपडे, विशाल पाटील, दिनकर पाटील, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी एकत्र येऊन लढत देत मोठा विजय खेचून आणला होता. मात्र वर्षभरातच सत्ताधारी आघाडीत बिघाडी झाली. सत्ताधारी पॅनलमधील अजितराव घोरपडे व विशाल पाटील हे दुरावत गेले आणि विरोधी मदनभाऊ गट सत्तेजवळ आला. दि. 23 नोव्हेंबर 2016 मधील सभापतीनिवडीनंतर डॉ. कदम- मदनभाऊ आणि संजयकाका गट सत्ताधारी झाला. 

अजितराव घोरपडे यांचा मोहरा संजय पाटील यांच्या गळाला
डॉ. कदम गटाने अजितराव घोरपडे यांच्यावर पुन्हा कुरघोडी केली आहे. उपसभापतीपदी निवड झालेले तानाजी पाटील (जाखापूर, ता. कवठेमहांकाळ) हे घोरपडे समर्थक संचालक होते. गेली चाळीस वर्षे ते घोरपडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मात्र ते संजय पाटील यांच्या छावणीत दाखल झाले आहेत. तानाजी पाटील यांना उपसभापती करून संजय पाटील यांनीही घोरपडे यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी साधली आहे. 

घोरपडेंवर कुरघोडी; संदर्भ अनेक
बाजार समितीत सत्ताधारी आघाडीत वर्षातच बिघाडी झाली होती. वर्षभरात घोरपडे यांनी सत्ताधार्‍यांना पायबंद घातले होते. उमदी व मिरजेजवळील जागा खरेदीत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पणनमंत्र्यांकडे तक्रारही केली होती. त्यामुळे घोरपडे गटाच्या संचालकांना यावेळी संधी मिळणार नाही हे स्पष्ट होते. जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीवेळी घोरपडे यांनी भाजपला साथ दिली होती. परिणामी संग्रामसिंह देशमुख हे अध्यक्ष झाले. त्याचे शल्यही कदम गटाला होते. त्यामुळे घोरपडे यांच्यावर कुरघोडी आणि संजय पाटील यांची सोबत हे तंत्र अवलंबले गेले. 

घोरपडे यांची करडी नजर यापुढेही
विशाल पाटील व घोरपडे यांनी बाजार समितीत संख्याबळ कमी असल्याचे लक्षात आल्याने शांत राहण्याचा पवित्रा घेतला. यापुढेही या नेत्यांना विरोधातच रहावे लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भाजपचे खासदार संजय पाटील आणि डॉ. कदम गट एकत्र आलेला असला तरी  दुखावलेल्या घोरपडे यांची करडी नजर बाजार समितीवर कायम राहणार आहे. सत्ताधारी मंडळींना डोळ्यात तेल घालून पारदर्शी कारभार करावा लागणार आहे. फळे व भाजीपाला नियमनमुक्त झाला आहे. अन्नधान्य, तृणधान्य, कडधान्येही नियमनमुक्त करण्याच्या हालचाली आहेत. अशा स्थितीत बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध स्त्रोत धुंडाळावे लागणार आहेत. बेदाणा व हळदीचे अद्यावत मार्केट उभारणीचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. 

घोरपडे विरोधात; पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते सभापती, उपसभापती

बाजार समितीचे नूतन सभापती दिनकर पाटील हे माजीमंत्री अजितराव घोरपडे यांचे मिरज पूर्व भागातील कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. मात्र जिल्हा परिषदेच्या सन 2012 च्या निवडणुकीपूर्वी त्यांचे घोरपडे यांच्याशी बिनसले आणि ते काँग्रेसवासी झाले. बाजार समितीत ते कदम-घोरपडे यांच्या विरोधी पॅनलमधून निवडून आले आणि आता ते सभापती झाले. नूतन उपसभापती तानाजी पाटील हे घोरपडे यांचे कट्टर कार्यकर्ते. त्यांच्या राजकारणाची सुरूवातच घोरपडे समर्थक म्हणून झाली. सलग चाळीस वर्षे ते घोरपडेंसोबत राहिले. नुकत्याच झालेल्या जाखापूर ग्रामपंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने त्यांच्यात बिनसले आणि  ते घोरपडे विरोधक संजय पाटील यांच्या छावणीत दाखल झाले. संजयकाकांनी त्यांनी उपसभापतीपदाची बक्षिसी दिली आहे. 

कापणीनंतर लगेचच पेरणी

बाजार समितीच्या गेल्या सभापती निवडीवेळी विशाल पाटील  व घोरपडे यांनी सत्तापरिवर्तनाची जुळणी केली होती. मात्र डॉ. कदम गटाने विरोधी मदनभाऊ गट व संजय पाटील यांची कुमक साथीला घेऊन ‘दे धक्का’ तंत्राचा अवलंब केला होता. ‘कापणी’नंतर डॉ. कदम गटाने पुढील सभापती निवडीची पेरणीही केली होती. सुगलाबाई बिरादार यांचे संचालकपद रद्द करून विरोधकांची ताकद कमी केली. त्याचाच परिणाम म्हणून यावेळी विशाल पाटील व घोरपडे यांनी शांत राहण्याचा पवित्रा अवलंबला.