Sun, Jul 12, 2020 19:16होमपेज › Sangli › सांगलीत पोलिस कर्मचाऱ्याचा निर्घृण खून

सांगलीत पोलिस कर्मचाऱ्याचा निर्घृण खून

Published On: Jul 18 2018 7:52AM | Last Updated: Jul 18 2018 8:41AMसांगली : पुढारी ऑनलाईन
जिल्हा पोलिस दलातील समाधान मानटे (वय ३०) यांचा धारदार हत्याराने १८ वार करून अमानुष खून करण्यात आल्‍याची घटना समोर आली आहे. विश्रामबाग येथील कुपवाड रस्त्यावर हॉटेल रत्ना डिलक्समध्ये मंगळवारी रात्री सव्वाबारा वाजता ही घटना घडली. ही घटना हॉटेलमधील सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यामध्ये दोन हल्लेखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

समाधान मानटे मूळचे बीड जिल्‍ह्‍यातील आहेत. सांगली जिल्हा पोलिस दलात ते २०१३ मध्ये भरती झाले आहेत. मिरज शहर पोलिस ठाण्यात ते नेणुकीस होते. त्यांच्याकडे वाहतुक कारवाईची जबाबदारी होती. ते विश्रामबाग पोलिस वसाहतीमध्ये पत्नीसह राहत होते. मंगळवारी रात्री काम संपवून घरी येत असताना ते रत्ना हॉटेलमध्ये दारू पिण्यास गेले होते. काउंटरवर दारू पिताना दोघा ग्राहकांशी त्‍यांचा वाद झाला. त्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारातच बोलत थांबले. तेवढ्यात वाद झालेले ग्राहक हॉटेलबाहेर निघून गेले. यातील एकजण गाडीतील धारदार हत्यार घेऊन आला. त्याने मानटे यांच्यावर सपासप १८ वार केले. यामध्ये मानटे रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण पावले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडविरोधी पथक, संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृत मानटे गणवेशात होते. मानटे यांच्या खुनाची घटना हॉटेलमधील 'सिसिटीव्ही' कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी त्याचे फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे पोलिसांनी पुढील तपासाला दिशा दिली आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकसह चार कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.