होमपेज › Sangli › सांगलीत पिस्तूल, गावठी कट्टा जप्त

सांगलीत पिस्तूल, गावठी कट्टा जप्त

Published On: Jun 06 2019 1:37AM | Last Updated: Jun 05 2019 11:21PM
सांगली : प्रतिनिधी

येथील शंभरफुटी रस्त्यावरील शामरावनगरमध्ये पिस्तूल, गावठी कट्टा व काडतुसांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाने बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली. त्यांच्याकडून पिस्तूल, गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, दुचाकी व दोन मोबाईल असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रतीक अनिल लकडे (वय 22, रा. खंडोबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे) व स्वप्नील आनंदराव जाधव (22, भोसरे, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  गुंडाविरोधी पथक शंभरफुटी रस्ता परिसरात गस्त घालत होते. पथकातील पोलिस शिपाई संतोष गळवे यांना दोन तरुण शामरावनगर येथे पिस्तूल व गावठी कट्टा विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा लावला. शामरावनगर चौकात दोन संशयितांना पथकाने  ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेची झडती घेण्यात आली. यामध्ये पिस्तूल, गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त केली. त्यांच्याविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संशयितांकडे कसून चौकशी

संशयित प्रतीक लकडे व स्वप्नील जाधव पहिल्यांदाच सांगली पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. सातारा तसेच पुणे जिल्ह्यातही त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद नाही. ते पिस्तूल व गावठी कट्टा कोणाला विकायला आले होते, याबद्दल चौकशी सरू आहे. लवकरच याचा छडा लावण्यात यश येईल, असे उपनिरीक्षक शरद माळी यांनी सांगितले.