Mon, Sep 16, 2019 06:21होमपेज › Sangli › बाजार समितीत डॉ. कदम, संजय पाटील यांची बाजी

बाजार समितीत डॉ. कदम, संजय पाटील यांची बाजी

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:45PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्‍न बाजार समिती  सभापती, उपसभापती निवडणुकीत काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम गट व भाजपचे खासदार संजय पाटील यांनी बाजी मारली. सभापतिपदी दिनकर पाटील (सोनी, ता. मिरज)व उपसभापतिपदी तानाजी पाटील (जाखापूर, ता. कवठेमहांकाळ) यांची बिनविरोध निवड झाली. दिनकर पाटील हे डॉ. कदम-मदनभाऊ गटाचे आहेत, तर तानाजी पाटील हे खासदार पाटील समर्थक आहेत. 

मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली सभापती, उपसभापती निवडीसाठी गुरुवारी बाजार समिती संचालक मंडळाची विशेष सभा झाली. याला सर्व 24 संचालक उपस्थित होते. 
सभापतिपद मिरज तालुक्यात मदनभाऊ गटाला मिळणार, हे स्पष्ट होते. त्यानुसार संचालक दिनकर पाटील व वसंतराव गायकवाड यांच्यात रस्सीखेच होती. समर्थकांकडून शेवटपर्यंत नेत्यांकडे फिल्डिंग लावली जात होती. गायकवाड यांची मदार जयश्रीताई पाटील यांच्यावर होती. अखेर दिनकर पाटील यांनी बाजी मारली. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास डॉ. कदम यांनी दिनकर पाटील यांच्या नावाचा ‘मेसेज’ सत्ताधारी गटाचे नेते विक्रम सावंत यांच्याकडे ‘फॉरवर्ड’ केला. बहूसंख्य संचालकांचा कलही पाटील यांच्या बाजुने होते.

अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी सत्ताधारी गटातर्फे सभापतीपदासाठी दिनकर पाटील व उपसभापतीपदासाठी तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. दिनकर पाटील यांच्या अर्जाला देयगोंडा बिरादार सूचक, तर प्रशांत शेजाळ अनुमोेदक होते. तानाजी पाटील यांच्या अर्जाला दीपक शिंदे सूचक, तर जीवन पाटील अनुमोदक होते. विरोधी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. खरात यांनी दिनकर पाटील व तानाजी पाटील यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीत विजयोत्सव साजरा केला. 

संजयकाका- विक्रम सावंत बैठक
खासदार  पाटील, भाजपचे नेते दिनकर पाटील व काँग्रेसचे युवा नेते विक्रम सावंत यांची गुरूवारी सकाळी सर्कीट हाऊस येथे बैठक झाली. तत्पूर्वी सावंत यांनी  जयश्री मदनभाऊ पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.  डॉ. कदम यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली. सभापती, उपसभापती निवडीच्या अनुषंगाने डॉ. पतंगराव कदम, जयश्री मदनभाऊ पाटील यांचे निरोप सर्कीट हाऊसमधील बैठकीत सांगण्यात आले आणि दिनकर पाटील, तानाजी पाटील यांच्या निवडीची औपचारिकता बाकी राहिली. दरम्यान सभापती, उपसभापती निवडीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत अजितराव घोरपडे, विशाल पाटील नव्हते. निवड प्रक्रियेत न येता शांत राहणे त्यांनी पसंत केले. 

संचालकांची 15 दिवसांची सहल; ‘जोतिबा’वरून थेट सभागृहात सभापती, उपसभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीचे सर्व गट, तट, विरोधी संचालकांना सत्ताधार्‍यांनी एकत्रितपणे 15 दिवस सहलीवर पाठविले होते. सभापती, उपसभापतींच्या राजीनाम्यानंतर लगेचच ते सहलीवर गेले होते. बुधवारी ते कोल्हापूर मुक्कामी होते. गुरूवारी त्यांना जोतिबा देवस्थानहून थेट सभागृहातच आणले. 

सत्ताधार्‍यांना जाणीवपूर्वक मदत केली : खासदार पाटील
नुतन सभापती, उपसभापतींचा खासदार  पाटील, विक्रम सावंत, दिनकर पाटील यांनी सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार पाटील म्हणाले,  बाजार समिती शेतकरी हिताच्यादृष्टीने महत्वाची आहे. इथे पक्षीय राजकारण आणले नाही. बाजार समितीवर वेगळे प्रसंग आणण्याचे प्रयत्न काहींनी केले. मात्र मी गेल्या वर्ष-दीड वषार्ंत सत्ताधार्‍यांच्या हाकेला ओ देण्याचे काम केले आहे. सत्ताधार्‍यांना जाणीवपूर्वक मदत केली आहे. सभापतीपदासाठी दोन-तीन नावे होती. सर्वांशी विचारविनिमय करून सभापती, उपसभापती निवड झाली आहे. 

सत्ताधारी नेते विक्रम सावंत म्हणाले, सभापती, उपसभातींचा कार्यकाल दहा महिन्यांचा असेल. बाजार समितीत कामकाजाची संधी प्रत्येकाला दिली जाणार आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलाईदार आदी सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम होईल.