होमपेज › Sangli › सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पकोडा’ मोर्चा  

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पकोडा’ मोर्चा  

Published On: Feb 12 2018 6:55PM | Last Updated: Feb 12 2018 6:55PMसांगली : प्रतिनिधी 

स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर 'पकोडा मोर्चा' काढला. विद्यार्थ्यांनी कढई, पकडो घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. रिक्त जागा त्वरीत भराव्यात, प्रलंबित शिक्षक भरती सुरू करावी, उत्तर पत्रिकेसाठी बारकोड पद्धतीचा वापर करावा इत्यादी मागण्या यावेळी केल्या. 

येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. हातात फलक आणि निषेधाच्या घोषणा देत मोर्चा दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे, गिरीश फोंडे, अमोल पाटील, गजानंद माळी, प्रशांत नलवडे, मयुर माने आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.  जिल्हाकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चा गेल्यानंतर महेश खराडे, अ‍ॅड. अमित शिंदे यांनी मोर्चास पांठीबा दिला. 

राज्यसेवेच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, पीएसआय, एसटीआय, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, दुय्यम निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदांसाठीची संयुक्त परिक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्र परिक्षा घेण्यात याव्यात. पोलिसांच्या बारा हजार जागा त्वरीत भराव्यात, प्रलंबित शिक्षक भरती सुरू करावी, उत्तर पत्रिकेसाठी बारकोड पद्धतीचा वापर करावा, प्रत्येक पदासाठी प्रतिक्षा यादी लावावी, स्पर्धा परिक्षेची बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यात यावी, तलाठी पदाची परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्यात यावी, स्पर्धा परिक्षेतील डमी रॅकेट प्रकरणाची सीबीआय मार्फत तपासणी करावी, जे उमेदवार कॉपी करतात त्यांना काळ्या यादीत टाकावे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, 30 टक्के नोकर कपातीचे धोरण रद्द करावे, आदी मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांच्याकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले.