Mon, Sep 16, 2019 12:07होमपेज › Sangli › पोलिस असल्याचे सांगून दमदाटी करणार्‍याला अटक

पोलिस असल्याचे सांगून दमदाटी करणार्‍याला अटक

Published On: Apr 19 2019 1:52AM | Last Updated: Apr 19 2019 1:52AM
मिरज : शहर प्रतिनिधी 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे - पाटील यांचा वर्गमित्र व पोलिस असल्याचे सांगून पोलिसांच्या कार्यात अडथळा आणल्याप्रकरणी गांधी चौकी पोलिसांनी आनंदराव विठोबा कसबे (रा. पुणे) याला अटक केली. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिस सतीश मुळे यांनी गांधी चौकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुरुवारी रात्री आनंदराव कसबे हा उत्तमनगर येथे संशयितरीत्या फिरताना सापडला. पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याला ताब्यात घेतले. “मी पोलिस आहे. विश्‍वास नांगरे - पाटील यांचा वर्गमित्र आहे. मी तुमची पोलिस खात्यातील नोकरी घालवतो”, असे म्हणून त्याने पोलिसांना दम दिला. 

सतीश व अन्य एका पोलिसाला त्याने दम देऊन धक्काबुक्की केली. तो पोलिस नसल्याची खात्री झाल्यानंतर आनंदराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.